संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह आणला अंजनगावच्या महावितरण कार्यालयात
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील दहिगाव रेचा येथील रहिवासी असलेल्या महिलेचा खिराळा शिवारात तुटलेल्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. २५ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास खिराळा शिवारात ही घटना घडली. या तुटलेल्या वीज तारेबाबत काही दिवसांपूर्वी तक्रार देण्यात आली होती. तरीही उपाययोजना न झाल्याने महिलेला प्राणास मुकावे लागले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ट्रॉलीमध्ये टाकून अंजनगावच्या महावितरण कार्यालयात आणला. आमदारांच्या मध्यस्थीने तणाव निवळला..
रूपाली शुद्धोधन सावळे (३६) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी तिच्यासह नऊ महिला अनिल धुमाळे यांच्या शेतात निंदणासाठी गेल्या होत्या. रुपालीने १० वाजताच्या सुमारास अरुण टकोरे यांच्या शेताचा धुरा गाठला. तेथे तुटलेल्या वीज तारेत वीजपुरवठा सुरू झाला आणि या तारेचा स्पर्श झाल्याने ती जागीच गतप्राण झाली. अन्य महिला रूपालीला ओढण्यासाठी निघाल्या असताना एका महिलेने त्यांना रोखल्याने त्यांचे प्राण वाचले. मृताच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी आहे. मोलमजुरी करून ती उदरनिर्वाह करीत असे. दरम्यान, ही वार्ता पसरताच कुटुंबीयांसह ग्रामस्थ व प्रहार पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मात्र उपस्थितांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यास नकार दिला आणि तो मृतदेह ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये टाकून अंजनगाव सूज सुर्जी येथे महावितरण कार्यालयात आणून ठिय्या दिला.
पोलिसांच्या अवरोधाला जुमानेना
अंजनगाव सुर्जी येथे जुना बस स्थानक परिसरात तसेच महावितरण कार्यालयाच्या गेटवरसुद्धा पोलिसांच्या ताफ्याने ग्रामस्थांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांना न जुमानता ट्रॅक्टर आवारात आणला आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा घेतला. आ. गजानन लवटे यांच्या मध्यस्थीने वाद निवळला. याप्रकरणी योग्य कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे गावकऱ्यांनी प्रेत उचलून शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय येथे आणले.
अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल
जमावाने संबंधित अभियंता व कर्मचाऱ्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून अटक व मोबदल्याची मागणी लावून धरली. पोलिसांनी सिद्धार्थ सावळे यांच्या तक्रारीवरून महावितरणचे अभियंता बी.एस. जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेची चौकशी वेगाने सुरू आहे.
आमदारांकडून तातडीची मदत
आ. गजानन लवटे यांनी २० हजारांचा धनादेश व स्वतःकडील २० हजार अशी ४० हजारांची मदत तातडीने नातेवाइकांकडे सोपविली. या घटनेत आर्थिक मोबदला मिळण्यासाठी स्थानिक महावितरण कार्यालयातून प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठविण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
तक्रारीची दखल नाही
काही दिवसांपूर्वी तुटून पडलेल्या या वीज वाहिनीबाबत शेतकऱ्याने महावितरण कार्यालयात तक्रार दाखल केली होती. मात्र, दखल घेतली गेली नाही. एक महिन्यापूर्वी दहिगाव रेचा येथे डीपीच्या संपर्कात आल्याने एक आदिवासी महिला जागीच मरण पावली, हे येथे उल्लेखनीय.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





