फुलांनी बाप्पांची आराधना, प्लास्टिक माळांना बायबाय !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

धामणगाव रेल्वे : राज्य सरकारने फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, लवकरच राज्यात प्लास्टिक व कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येणार आहे.

अलीकडच्या काळात विविध समारंभ, मंदिरे, मंगल कार्यालये, उत्सव आदी ठिकाणी प्लास्टिक फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढल्यामुळे नैसर्गिक फुलांची मागणी घटली होती. परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत होते.

अमरावती जिल्ह्यात झेंडू, गुलाब, शेवंती, निशीगंध, मोगरा, अन्य प्रकारच्या फुलांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. प्लास्टिक फुलांवरील बंदीमुळे स्थानिक बाजारपेठेला गती मिळण्याची आशा आहे. इतर शहरांतून फुलांना मागणी वाढल्यास शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात गणरायाचे आगम होणार असून या सण उत्सवाच्या कालावधीत फुलांची अधिक मागणी वाढते.

 

बंदीचा फायदा इतर व्यावसायिकांनाही…

फूल सजावट करणारे डेकोरेटर्स, हार तयार करणारे, फुलांची वाहतूक करणारे व्यापारी अशा अनेक व्यावसायिकांना या बंदीचा फायदा होणार आहे. नैसर्गिक फुलांवर आधारित संपूर्ण साखळी पुन्हा सशक्त होणार आहे. यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, शिवाय प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान थांबणार आहे. अमरावती जिल्ह्यात अद्यापही बंदीबाबत आदेश आले नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. परंतु, गणपतीच्या पार्श्वभूमीवर, असा निर्देश सगळीकडेच लागू होण्याची शक्यता आहे.

 

फुलांचे पारंपरिक महत्त्व

भारतीय संस्कृतीत फुलांना विशेष महत्त्व आहे. देवताचं फूल अशाही परंपरा आहेत. पूजा, उत्सव, विवाहसोहळे अशा प्रत्येक शुभप्रसंगी नैसर्गिक फुलांचा वापर होतो. परंतु, प्लास्टिक फुलांनी ही परंपरा विस्मृतीत जात होती. मात्र, या फुलांच्या बंदीमुळे नैसर्गिक फुलांची मागणी वाढेल.

 

प्लास्टिकमुळे फूल उत्पादक संकटात !

प्लास्टिक फुलांच्या वापरामुळे शेतीमधून आलेल्या फुलांची विक्री कमी होत चालली होती. खासकरून गुलाब, झेंडू, शेवंती, मोगरा यांसारख्या पारंपरिक फुलांची बाजारपेठ कमी होत गेली. अनेक शेतकरी फूलशेती सोडून इतर पिकांकडे वळू लागले होते; पण प्लास्टिक फुलांवर बंदी आल्यास बाजारात नैसर्गिक फुलांची मागणी पुन्हा वाढेल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

प्लास्टिक पिशव्यांवर पूर्वीपासून बंदी होती. त्याअनुषंगाने शहरात अंमलबजावणीही सुरू आहे. परंतु, प्लास्टिक व कृत्रिम फुलांवर बंदीबाबत आम्हाला अद्याप कुठले पत्र किंवा निर्देश आले नाही. निर्देश येताच अमंलबजावणी करण्यात येईल.

पूनम कळंबे, मुख्याधिकारी, नगर परिषद,

धामणगाव रेल्वे

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013513
error: Content is protected !!