अचलपूर, परतवाडा जुळ्या शहरात माकडांच्या टोळ्यांचा हैदोस, नागरिक त्रस्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

परतवाडा : अचलपूर-परतवाडा शहरात माकडांच्या टोळ्या हैदोस घालीत आहेत. एखाद्या शत्रूवर आक्रमण करावे त्याप्रमाणे या टोळ्या घरांच्या छतावर, अंगणात, वेळप्रसंगी घरात घुसून धुडघूस घालीत आहेत. घरातील स्वयंपाक घरासह बेडरूमपर्यंत त्या माकडांची मजल गेली आहे. घरात घुसून पोळ्या, भाकरीसह अन्य खाद्यपदार्थ ते पळवित आहेत. अंगणात किंवा बाहेर उभ्या असलेल्या दुचाकी ते पाडत आहेत. चारचाकीच्या टपावर उड्या मारून नुकसान करीत आहेत. फुलझाडे ओरबडून खात आहेत. नागरिकांना त्यांनी सळो की पळो करून सोडले आहे.

माकडांच्या एका टोळीत लहान मोठ्या २५-३० जणांचा समावेश आहे. रस्त्यावर ही माकडे एकामागोमाग घोळक्याने धावतात. मध्ये येणाऱ्याला आणि त्यांना हाकलणाऱ्याला चावा घेण्यापर्यंत त्यांनी मजल गाठली आहे. अनेक महिला व पुरुष, लहान मुलेदेखील त्यांचा बळी ठरली आहेत. लहान-मोठे अपघातही घडत आहेत.

नागरिकांकडून सूचना, पथकच नाही

हैदोस घालणाऱ्या आणि नागरिकांच्या जिवावर उठलेल्या या माकडांना पकडण्याकरिता, त्यांच्या बंदोबस्ताकरिता नागरिकांकडून वनविभागाला अनेकदा सूचित केले. पण, अजूनही या माकडांच्या टोळ्यांना वनविभागाने पकडलेले नाही. त्यांना पकडण्यासाठी मोहीम राबविलेली नाही.

माकडांमध्येही टोळीयुद्ध

दरम्यान शेपटी तुटलेले, एका पायाने, एका हाताने लंगडे असलेल्या काही माकडांनी या टोळीचे नेतृत्व आपल्याकडे घेतले आहे. नागरिकांना सळो की पळो करून सोडणाऱ्या या माकडांमध्येही टोळीयुद्ध होते. या टोळीयुद्धाचाही नागरिकांना फटका बसत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013512
error: Content is protected !!