वातावरण बदलाचा परिणाम, निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान
अमरावती : जागतिक वातावरण बदलाचे परिणाम आता राज्यासह जिल्ह्यात दिसून येत आहेत. जिल्ह्यातही पाच वर्षात पावसाच्या आगमनात विविधता आहे. यामध्ये जूनमध्ये पावसाची उसंत राहिली आहे, तर जुलै व ऑगस्ट महिन्यांत दमदार पाऊस झालेला आहे. एकूणच पावसाचा पॅटर्न आता बदलला दिसून येत आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे मात्र पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
यावर्षी मे महिन्यात तब्बल २२ दिवस पावसाची नोंद झाली. त्यानंतर जून महिन्यात नेहमीपेक्षा आठ दिवस मान्सून लवकर आला. जिल्ह्यासह विदर्भात मात्र मान्सूनची गती मंद झाली. त्यानंतर १० दिवसांनी म्हणजेच जूनअखेरीस जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाची नोंद झाली. पेरण्या या कालावधीत आटोपल्यानंतर पुन्हा १२ दिवस पावसाने उसंत घेतली व आता दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस होत आहे. सद्यःस्थितीत २९ टक्के पावसाची तूट १२ तालुक्यांत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ३६९.४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २६४.४ मिमी पाऊस झालेला आहे. ही ७१.७ टक्केवारी आहे. यामध्ये केवळ तिवसा व वरुड तालुक्यात फक्त पावसाने सरासरी पार केलेली आहे. उर्वरित १२ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत.
मान्सून प्रणालीतील बदलाचा फटका
मान्सून वाऱ्यांचा वेग आणि दिशा हवामान बदलामुळे प्रभावित होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाऊस लवकर, तर काही ठिकाणी उशिरा येतो. पावसाची तीव्रता देखील अनियमित झाली आहे.
शेतकऱ्यांना फटका
पावसाच्या विलंबाने पेरण्या उशिरा होतात व नंतरही पावसाचा खंड राहत असल्याने पिकांच्या वाढीवर याचा परिणाम होतो.
ऑगस्ट व सप्टेबर मध्ये दमदार पाऊस व ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस नेमका मूग, उडीद व सोयाबीन काढणीच्या वेळेतत असल्याने पिकांचे नुकसान होते.
कशामुळे बदलला पॅटर्न? जागतिक तापमानात वाढ
पावसाचा पॅटर्न बदलात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते. त्याचा थेट परिणाम पावसाच्या पद्धतीवर होत आहे.
समुद्र पृष्ठभागाचे तापमान
हिंद महासागर, पॅसिफिक महासागर (अल् निनो व ला निना) मधील तापमानातील बदलामुळे पावसाचा पॅटर्न बदलतो.
जंगलतोड आणि शहरीकरण
मोठ्या प्रमाणावर जंगलतोड, डांबरी रस्ते व काँक्रीटच्या रस्त्यांमुळे वातावरणातील आर्द्रतेचा नैसर्गिक संतुलन बिघडतो. हे देखील पावसाच्या पद्धतीला अस्थिर करते.
औद्योगिक प्रदूषणाचा थेट पावसावर परिणाम हवेत असलेल्या धूलिकणांमुळे ढगांमध्ये पाण्याचे थेंब तयार होण्याची प्रक्रिया बदलते, ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असल्याची तज्ज्ञांची माहिती आहे.
पावसाचा पॅटर्न बदलला (मिमी)
वर्ष जून जुलै ऑगस्ट
२०२० १९०.९ २७०.६ २१८.८०
२०२१ २१३.८ २१३.५० १३०.८०
२०२३ ५७.५ ३१३.६ ५८.४
२०२४ १३१.९ ३०१.८ २३७.५
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





