वाहतुकीस अडथळा, सार्वजनिक बांधकाम विभाग लागला तातडीने कामाला
चिखलदरा : परतवाडा-घटांग-काटकुंभ मार्गावर शुक्रवारी सकाळी मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. नागरिकांनी काही प्रमाणात दगड रस्त्याच्या कडेला टाकून मार्ग सुरळीत केला, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दखल घेत दरडी हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मेळघाटातील दरवर्षी पावसाळ्यात आदिवासी पाड्यांमध्ये जाणारे मार्ग दरड कोसळून बंद होतात. धारणी-खोंगडा मार्गावर तीन दिवसाोपूर्वी दरड कोसळल्याने प्रवासी व नागरिकांनाच हटवून बाजूला करून प्रवास करावा लागला होता. गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी घटांग-डोमा मार्गातील देवी मंदिराजवळ दरड कोसळली. त्यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती. ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी वाहने पुढे काढण्यासाठी तात्पुरता रस्ता व्यवस्थित केला. दरम्यान, माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यकारी अभियंता नीलेश चौधरी यांनी संबंधित शाखा अभियंता व मैल कुली यांना रस्ता सुरळीत करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





