बाजार परवाना नसेल तर दुकानांना सील करू, अशा आशयाची नोटीस व्यापाऱ्यांना बजावण्यात आली. या नोटीसमुळे सांगली महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
सांगली – महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना सांगली महापालिकेकडून तुघलकी फर्मान जारी करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी महापालिकेकडुन बाजार परवाना घ्यावा. परवाना नसेल तर परवाना मिळेपर्यंत दुकान बंद ठेवावे. अन्यथा दुकान सील करू, अशी नोटीस पालिका प्रशासनाकडून सुमारे 1 हजारहून अधिक व्यापाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. यावरून व्यापारी आक्रमक झाले आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील व्यापाऱ्यांना महापालिकेकडून बाजार परवाना घेण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. शहरात व्यापार करत असताना त्यासाठी पालिकेकडून बाजार परवाना घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. जर बाजार परवाना नसेल तर, तो महापालिकेकडून अर्ज करून करून घेण्यात यावा. नोटीस मिळताच दुकान बंद करावे. अन्यथा दुकानांना सील करू, अशा आशयाची नोटीस व्यापाऱ्यांना बजावण्यात आली. या नोटीसमुळे सांगली महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष आणि व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेचे राज्याध्यक्ष समीर शहा यांनी पालिकेच्या आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधींच्या कारभारावर टीका केली आहे.
महापालिकेच्या नोटीस म्हणजे खंडणी वसुलीचा प्रकार- समीर शहा म्हणाले,” ऐन सणासुदीच्या तोंडावर महापालिकेच्या नोटीस म्हणजे खंडणी वसुलीचा प्रकार आहे. महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडून बजावण्यात आलेली नोटीस बेकायदेशीर आहे. आयुक्त सत्यम गांधी हे सध्या प्रशासक आहेत. महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना बाजार परवाना कर लावण्याबाबतचा निर्णय हा लोकल बॉडीच्या महासभेत नगरसेवकांच्या उपस्थित होणं आवश्यक आहे. सध्या लोकल बॉडी अस्तित्वात नाही. सत्यम गांधी हे प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीच्या परवान्यासाठी महासभेची मान्यता आवश्यक आहे. यामुळे त्यांच्याकडून बाजार परवानाबाबतच्या काढण्यात आलेल्या नोटीस या बेकायदेशीर आहेत”.
इतर खर्च महापालिका भागवणार का? “आरोग्य विभाग व्यवसाय परवाना, बाजार परवाना अशा नोटीस वाटून नोंदणीची सक्ती महापालिका आयुक्त करत आहेत. नोटीस मिळताच आपला व्यवसाय आणि दुकान बंद करावे. परवाना घेऊन मग सुरू करावे, असे नोटीसमध्ये म्हटलं आहे. मग जीएसटी, प्राप्तीकर हे आयुक्त भरणार आहेत का? आमचे इतर खर्च महापालिका भागवणार का? असं लिहायचा अधिकार आणि या नोटीस पाठवायचा अधिकार आयुक्तांना आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं. यापूर्वी आरोग्य विभाग व्यवसाय परवाना म्हणून लूट केली. त्याचादेखील हिशोब द्यावा लागेल”, अशा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष शहा यांनी दिला.
सध्या आम्ही व्यापारी 11 प्रकारचे केंद्रीय, राज्यस्तरीय आणि 17 प्रकारचे स्थानिक कर भरत आहोत. त्याचे परवाने आणि शुल्कही भरत आहोत. मुळात महापालिका असेही कर आमच्याकडून घेत आहे. त्याचा आमच्याशी कोणताही सबंध नाही. पण या 17 प्रकारचा कर घेऊन व्यापाऱ्यांना शून्य सुविधा मिळत आहेत. इतकं सगळं असताना हा बाजार परवाना का त्याचे भरमसाठ वार्षिक शुल्क कशाकरिता घेण्यात येत आहे? त्या बदल्यात कोणत्या सुविधा देणार आहेत? हे आधी स्पष्ट करावं- व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष, समीर शहा
निवडणुकीमध्ये याचे परिणाम भोगावे लागतील- “सध्या प्राथमिक सुविधा देण्याससुद्धा महापालिका असमर्थ आहे. नुसती दंडात्मक कारवाई आणि नोटीस वाटून दहशत निर्माण करणं एवढंच त्यांना जमतंय. हे सगळं इथले लोकप्रतिनिधी उघड्या डोळ्यांनी बघत बसले आहेत. असं का करत आहात, असं आयुक्तांना विचारायची त्यांना गरज वाटत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. या नोटीस आणि सदर कर रद्द करावेत, असे आम्ही महापालिका आयुक्तांना आवाहन करत आहोत. आमच्याशी चर्चा करावी, तोपर्यंत महापालिकेच्या बाजार परवान्यावर बहिष्कार घालण्यात येत आहे. आम्ही कोणताही परवाना घेणार नाही. तसेच महापालिकेच्या मनमानी कारभाराबाबत आमदार-खासदारांनीदेखील लक्ष द्यावं. अन्यथा येत्या महापालिका निवडणुकीमध्ये याचे परिणाम भोगावे लागतील”, असा सज्जड इशारादेखील समीर शहा यांनी दिला आहे.
पाच वर्षानंतर होणार निवडणुका- एप्रिल 2020 मध्ये राज्यातील महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं. मात्र कोरोना महामारीमुळं कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याकरिता निवडणुकीला स्थगिती मिळाली. त्यानंतर न्यायालयात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगितच राहिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर यंदा वर्षाखेरपर्यंत निवडणुका होणार आहेत. मागील पाच वर्षांपासून इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक हे निवडणुकीची प्रतिक्षा करत आहेत. सांगली महापालिकेत व्यापारी नाराज झाले तर त्याचा फटका लोकप्रतिनिधींना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





