पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत.
नवी दिल्ली : भारत उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 रोजी 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. यंदाचा हा कार्यक्रम ‘नवीन भारत’ या थीमवर आधारित असणार आहे. जो देशाची प्रगती, आत्मनिर्भरता आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय दाखविणारा असणार आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे की, पंतप्रधान राष्ट्रीय ध्वज फडकावतील आणि लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. हा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव समृद्ध, सुरक्षित आणि धाडसी नवीन भारताच्या सतत उदयाचं स्मरण करण्यासाठी आणि प्रगतीच्या मार्गावर पुढं जाण्यासाठी नवीन ऊर्जा देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पंतप्रधान मोदींचं करतील स्वागत : 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ल्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह स्वागत करतील. त्यानंतर संरक्षण सचिव दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल भवनिश कुमार यांची पंतप्रधानांशी ओळख करून देतील. त्यानंतर, दिल्ली क्षेत्राचे जीओसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलामी स्थानी घेऊन जातील. या ठिकाणी संयुक्त आंतर-सेवा आणि दिल्ली पोलीस जवान पंतप्रधानांना सलामी देतील. त्यानंतर पंतप्रधान मानवंदनेचा स्वीकार करतील.
भारतीय हवाई दलाला समन्वयक सेवेचा मान : पंतप्रधानांना मानवंदना देणाऱ्या पथकात यावर्षी 96 जवानांचा (लष्कर, नौदल, हवाई दल तसंच दिल्ली पोलीस यांतील प्रत्येकी एक अधिकारी आणि 24 जवान) समावेश आहे. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी भारतीय हवाई दलाला समन्वयक सेवेचा मान देण्यात आला आहे. मानवंदना स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्याकडे प्रस्थान करतील. याठिकाणी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, तसंच लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करतील.
21 तोफांची सलामी : फ्लाइंग ऑफिसर रशिका शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रध्वज फडकवण्यास मदत करतील. यावेळी 1721 फील्ड बॅटरी (सेरेमोनियल) द्वारे स्वदेशी 105 मिमी लाईट फील्ड गनद्वारे 21 तोफांची सलामी दिली जाईल, ज्याचं नेतृत्व मेजर पवन सिंग शेखावत करतील. तसंच पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज ध्वज फडकवला जात असतानाच, लष्कर, नौदल आणि हवाई दल तसेच दिल्ली पोलीस या दलांतील प्रत्येकी एक अधिकारी आणि इतर श्रेणीचे 32 जवान अशा एकूण 128 सैनिकांचा समावेश असलेले राष्ट्रीय ध्वजरक्षक पथक राष्ट्रीय सलामी देईल.
निमंत्रण पत्रिकेवर ऑपरेशन सिंदूरचा लोगो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर एक राष्ट्रध्वज फडकवणारे हेलिकॉप्टर आणि दुसरं ‘ऑपरेशन सिंदूर’चा ध्वज फडकवणारे हेलिकॉप्टर अशा दोन एमआय-17 हेलिकॉप्टर्समधून कार्यक्रमस्थळी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात येईल. विंग कमांडर विनय पूनिया आणि विंग कमांडर आदित्य जैस्वाल हे या हेलिकॉप्टर्सचे कप्तान असतील. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात ऑपरेशन सिंदूरचे यश साजरं केलं जाणार आहे. ज्ञानपथ येथील व्ह्यू कटरवर ऑपरेशन सिंदूरचा लोगो असेल. फुलांची सजावट देखील या ऑपरेशनवर आधारित असेल. निमंत्रण पत्रिकेवर देखील ऑपरेशन सिंदूरचा लोगो आहे. तसंच निमंत्रण पत्रिकेवर चिनाब पुलाचा वॉटरमार्क देखील आहे, जो ‘नवीन भारत’चा उदय दर्शवितो. यावर्षी पहिल्यांदाच 11 अग्निवीर राष्ट्रगीत वाजवणाऱ्या बँडमध्ये भाग घेतील.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





