किश्तवाड जिल्ह्यातील हिंदूंचे पवित्र तीर्थस्थान असलेल्या मचैल माता येथे भाविक जात असताना चिशुती भागात ढगफुटीची घटना घडली.
जम्मू (श्रीनगर) – जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली. यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बचाव कार्य सुरू केलं आहे.
किश्तवाडच्या पद्दार उपविभागातील चोसीटी गावात ढगफुटी झाल्यानंतर १० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, मृतांच्या संख्येबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.
- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, ” पद्दार उपविभागातील चोसीटी भागात ढगफुटी झाल्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. नुकसानीचं मूल्यांकन करण्यासाठी आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी बचाव पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. संकटात सापडलेल्या लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवली जाईल”.
मदत कार्य अधिक जलद करण्याचे निर्देश- जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, “चोसिटी किश्तवाडमधील ढगफुटीच्या घटनेनं मी दुःखी आहे. शोकाकुल कुटुंबांबाबत दु:ख व्यक्त करत आहे. तसेच जखमींच्या लवकर प्रकृतीसाठी प्रार्थना करतो. पोलीस, सैन्य, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्य अधिक जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.”
श्री मचैल यात्रा स्थगित- विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते सुनील शर्मा, किश्तवाडचे उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक बचाव कार्याचे नेतृत्व करण्यासाठी रवाना झाले आहेत. श्री मचैल यात्रेसाठी चारचाकी गाड्या पार्क केलेल्या ठिकाणी ढगफुटीची घटना घडली आहे. त्याठिकाणी अनेक तात्पुरती दुकाने उभारली आहेत. एडीसी किश्तवाड यांच्या माहितीनुसार श्री मचैल यात्रा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. जनतेनं घाबरू नये, असे त्यांनी आवाहन केलं. स्थानिकांच्या माहितीनुसार ढगफुटी झालेलं ठिकाण हे दुर्गम स्थानी आहे. मुसळधार पाऊस आणि दळणवळणाचा अभाव यामुळे यामुळे घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे येत आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





