वरळीकरांना 556 सदनिकांचे आज वाटप केले असून, लवकरच उर्वरित टप्पे पूर्ण करून धारावीचा अशाच पद्धतीने पुनर्विकास केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान दिली आहे.
मुंबई – बहुप्रतीक्षित अशा वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला असून, 500 चौरस फुटांच्या घरांच्या चाव्या आज रहिवाशांना देण्यात आल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्य उपस्थितीत या सदनिकांच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडला. एकूण 556 सदनिकांचे आज वाटप करण्यात आले असून, लवकरच उर्वरित टप्पे पूर्ण करून धारावीचा देखील अशाच पद्धतीने पुनर्विकास केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान दिली आहे.
बीडीडी चाळीने मागच्या 100 वर्षांचा इतिहास पाहिलाय : माटुंग्याच्या यशवंत नाट्यगृहात झालेल्या चावी वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “ही केवळ चाळ नाही. तर हा इतिहास आहे. या चाळीने मागच्या 100 वर्षांचा इतिहास पाहिलेला आहे. या चाळीच्या भिंतींमध्ये अनेक कहाण्या आहेत. अनेक प्रसंग, आठवणी या चाळीच्या भिंतीनी पाहिलेले आहेत. विविध कारणांसाठी या चाळीतील घरांमध्ये काही वेळा येणे झाले. त्यावेळी मी पाहिलं, ही फक्त नावालाच चाळ आहे. मात्र, इथल्या लोकांचं जगणं हे झोपडपट्टीतील रहिवाशांपेक्षा वाईट आहे. पुढे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपलं महायुतीचं सरकार आलं आणि आम्ही बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेतला.”
म्हाडाच्या मदतीने आम्ही याचे ग्लोबल टेंडर काढले : पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “ह्या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या. अनेक मोर्चे काढण्यात आले. अगदी न्यायालयापर्यंत काही प्रकरणे गेली. पण सर्व होऊनदेखील अखेर हा प्रकल्प आज पूर्णत्वास आला आहे. कुठला तरी बिल्डर येईल आणि या चाळीचा पुनर्विकास करेल याची वाट पाहिली जात होती. मात्र, आम्ही सरकार म्हणून पुढाकार घेतला आणि म्हाडाच्या मदतीने आम्ही याचे ग्लोबल टेंडर काढले. पुढे टाटा आणि एलअँडटी यांसारख्या नामांकित कंपन्यांना याचं कंत्राट देण्यात आलंय. अतिशय छोट्या छोट्या बाबी विचारून घेऊन हा प्रकल्प सुरू करण्यात आला. आता अखेर अनेक अडचणींवर मात करून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आता बीडीडीप्रमाणेच धारावीचा देखील विकास केला जाणार आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
छोट्या छोट्या गोष्टी विचारात घेतल्या : या चावी वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “मी जाणीवपूर्वक या प्रकल्प स्थळावर लवकर आलो. या कामात काही त्रुटी मिळतात का? हे मला पाहायचं होतं. मी संपूर्ण प्रकल्प पाहिला. छोट्या छोट्या गोष्टी विचारात घेतल्या. पण मला एकही चूक या प्रकल्पात दिसली नाही. 1991 पासून मी सार्वजनिक जीवनात काम करत आहे. आतापर्यंत अनेक लोकार्पण सोहळ्याला गेलो. तिथे काही ना काही त्रुटी आढळल्या. सवयीप्रमाणे इथे देखील आलो. चार पिढ्या लोक या चाळींमध्ये राहिली आहेत. या घराच्या चाव्या देताना आमच्या आई-वडिलांच्या वयाच्या या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटलं. विकासासाठी कोणताही निधी मी कमी पडू देणार नाही, याची मी राज्याच्या प्रमुखांच्या साक्षीने हमी देतो. पण तुम्ही कोणत्याही मोहाला बळी पडू नका. ही घरं विकू नका. आपला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आला पाहिजे,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
चाळीतून तुम्ही मोठ्या टॉवरमध्ये जात आहात : तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज चाळीतून तुम्ही मोठ्या टॉवरमध्ये जात आहात. त्यामुळे उद्या घरावर झेंडा फडकवा. हा पुनर्विकास प्रकल्प हे आमच्या महायुतीचे यश आहे. इथे तुम्ही निवांत आणि निश्चिंत राहा, पुढची 12 वर्ष ही घरे मेंटेनन्स फ्री आहेत. याच प्रकल्पात तुमच्यासाठी आम्ही एक टक्का स्टॅम्प ड्युटीदेखील कमी केली. इतर टप्पेदेखील पूर्ण होतील आणि बीडीडी चाळीतील इतर रहिवाशांनादेखील लवकरच घर मिळतील. आज धारावी आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा परिसर म्हणून ओळखला जातो. पण बीडीडी चाळीप्रमाणेच आपण धारावीचा देखील पुनर्विकास करणार आहोत. पुढच्या एक ते दीड वर्षात तुम्हाला मुंबईत शोधून देखील एकही खड्डा दिसणार नाही. पहिला फेज जवळपास पूर्ण झालेला आहे. उर्वरित कामदेखील लवकरच पूर्ण होईल. मुंबई खड्डेमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. बीडीडी तो झाकी है धारावी अभी बाकी है,” असे एकनाथ शिंदे म्हणालेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





