महायुतीत आधीच पालकमंत्रीपदावरून वाद सुरु असताना आता ध्वजारोहणावरूनही धुसफूस आणि नाराजीनाट्य चव्हाट्यावर आले आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला लोकांनी भरभरून मतं दिली. त्यामुळं महायुती पुन्हा एकदा सत्तेत आली आहे. पण आता सरकार येऊन 8-9 महिने झाले तरी अजूनही महायुतीतील नाराजीनाट्य काही थांबताना दिसत नाही. तर दुसरीकडे अजूनही महायुतीतील नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला नाही. दरम्यान, नाशिक आणि रायगडचा पालकमंत्रीपदावरून वाद चिघळण्याची शक्यता असताना, आता पालकमंत्री या नात्यानं ध्वजारोहण कोण करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावर आता सरकारनं मध्यम मार्ग काढला आहे. यानुसार रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरे तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत. पण नाशिक येथे इच्छुक असलेले छगन भुजबळ, दादा भुसे तसंच रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांची नाराजी समोर आली आहे. महायुतीत आधीच पालकमंत्रीपदावरून वाद सुरु असताना आता ध्वजारोहणावरूनही धुसफूस आणि नाराजीनाट्य चव्हाट्यावर आले आहे. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं दिसून येत आहे.
छगन भुजबळ नाराज आहेत का? : दरम्यान, सरकारनं वाद टाळण्यासाठी मध्यम मार्ग म्हणून कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार याचं परिपत्रक काढलं होतं. यानुसार मंत्री छगन भुजबळ हे गोंदिया जिल्ह्याचे ध्वजारोहण करणार होते. मात्र, त्यांनी गोंदिया जिल्ह्याचे ध्वजारोहण करण्यास नकार दिला आहे. यानंतर याबाबत शासनाकडून नव्यानं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार, आता मंगलप्रभात लोढा हे गोंदिया जिल्ह्याचे ध्वजारोहण करणार आहेत. पण, अचानक मंत्री छगन भुजबळ यांनी ध्वजारोहण करण्यास का नकार दिला? छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याचे ध्वजारोहण करण्याची इच्छा होती, मात्र ते न मिळाल्यामुळं भुजबळ नाराज आहेत का? नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यास त्यांना डावलण्यात आल्यामुळं ते महायुतीत नाराज आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केले जात असून, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मंत्रीपदावरती पाणी सोडलं, तिथं पालकमंत्री काय… : रायगड जिल्ह्यात मंत्री आदिती तटकरे या ध्वजारोहण करणार आहेत. शिवसेनेचे नाराज असलेले मंत्री भरत गोगावले यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीवारी केली. येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याचं समजते. तसंच पालकमंत्री पदासाठी त्यांचा दावा होता. रायगडचे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल, असं दोन दिवसांपूर्वी ठामपणे गोगावले सांगत होते. परंतु आता त्यांनी घूमजाव केला असून, “ज्या माणसानं अडीच वर्षे मंत्रीपदावरती पाणी सोडलं, तिथं पालकमंत्री काय चीज आहे? जिथे ग्रामपंचायत सदस्य लोकं सोडत नाहीत. तिथे मी अडीच वर्ष मंत्रीपद सोडलं. भरतशेठ गोगावलेचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिलं जाईल, पालकमंत्री काय मोठं नाही,” असं म्हणत भरत गोगावलेंनी पालकमंत्रीपदावरून दावा सोडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, यावेळी त्यांनी सुनील तटकरेंवर जोरदार निशाणा साधला. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रात कुठेही खासदार निवडून आला नाही. मात्र रायगडमध्ये आम्ही राष्ट्रवादीसाठी काम केलं आणि त्यांचा एक खासदार निवडून आणला. त्यामुळं आता सुनील तटकरे यांची उलटी गिनती सुरु झाली आहे, अशी बोचरी टीका भरत भोगावलेंनी खासदार सुनील तटकरेंवर केलीय. याला सुनील तटकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “मी एवढ्या लहान माणूस नाही की, त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर द्यावं,” असा टोला सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंना लगावला. तर रायगडमधील पालकमंत्रीपदाच्या वादात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही उडी मारली आहे. रायगडचे पालकमंत्री पद हे शिवसेनेलाच मिळालं पाहिजे, असं थोरवे यांनी म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
सरकार स्वार्थी, फेक व्होटर्सच्या मदतीनं आलंय : “मुळात शिंदेंचा पक्ष हा काही पक्ष नाही, तो एक गट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सुद्धा एक गट आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून या लोकांनी निवडणुकीत मत मिळवली आहेत. परंतु आता निवडणूक आयोगाचे बिंग बाहेर फुटत असल्यामुळं त्यांच्याविरोधात जन आक्रोश होत आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाचे धाबे दणाणले आहेत. ही लोकं सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी एकत्र आलेली आहेत. त्यामुळं त्यांना मंत्रीपद, पालकमंत्रीपद नाही मिळालं की, त्यांचे रुसवे-फुगवे आणि नाराजी होतात. ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये अजित पवार अर्थमंत्री असताना निधी देत नाहीत, म्हणून ज्यांनी टीका केली. तेच आता अजित पवारांसोबत बसलेत. मंत्रिपद असो…किंवा ध्वजारोहण असो यावरून त्यांची नाराजी सुरू आहे. ती कधी ना कधी होणारच होती. आगामी काळातही यापेक्षा मोठी धूसफूस चव्हाट्यावरती येईल,” अशी टीका शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी “ईटीव्ही भारत”शी बोलताना महायुतीवर केली आहे. तर “मंत्रीपद मिळाल्यानंतरही पालकमंत्रीपदासाठी रुसवे-फुगवे आणि नाराज होणे, आता तिथे पालकमंत्री पदासाठी लिंबूला टाचणी मारणे… हे काही बरोबर नाही. मुळात हे सरकार स्वार्थी आहे. फेक व्होटर्सच्या मदतीनं आलं आहे,” असं म्हणत शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांनीही टीका केली आहे.
पालकमंत्रीपदाचा तिढा कधी सुटणार? : एकीकडे, महायुतीचं सरकार येऊन 8-9 महिने झालेले आहेत. त्यामुळं महायुतीतील सुरुवातीला मंत्रीपदावरून आणि खातेवाटपावरून विलंब झाला होता. यानंतर रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नाही. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अन्य योजनेतील निधी इकडे वळवला जात आहे. यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच निधीवरून शिवसेनेच्या मंत्र्यांना डावललं जातंय, अशी तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली होती. हे सर्व महायुतीत वाद सुरु असताना आता ध्वजारोहणाचा महायुतीत वाद उफाळून आलेला आहे. छगन भुजबळांनी गोंदिया जिल्ह्याचे ध्वजारोहण करण्यास नकार दिला आहे. तर रायगडमधील ध्वजारोहणावरून शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे यांनी नाराज व्यक्त केली आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. त्यामुळं जरी महायुतीत वरवर जरी चांगलं दिसत असलं किंवा महायुतीतील नेते ‘मस्त चाललंय आमचं’ असं म्हणत असले तरी अंतर्गत वाद आणि कुरघोडी वारंवार चव्हाट्यांवर येताना दिसून येत आहे. आता 15 ऑगस्टच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा वाद उफाळून आल्यामुळं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकमेकावर कुरघोडी करत असून, त्यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळं सरकारवर टीका करण्यास विरोधकांनाही आयतं कोलीत मिळालं आहे. 8-9 महिन्यानंतरही पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नसताना, आता राष्ट्रवादी-शिवसेनेतील मंत्री पालकमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचं चित्र आहे. महायुतीत निधीवाटप असो… पालकमंत्री पद असो… किंवा अन्य बाबीवरून नाराजीनाट्य, रुसवे-फुगवे हे सतत दिसत आहे. परिणामी पालकमंत्रीपदाचा तिढा कधी सुटणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





