श्रावण महिन्यामुळं त्र्यंबकेश्वर इथं मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी उसळली आहे. यातच दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
नाशिक : सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळं त्र्यंबकेश्वरला महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी तुफान गर्दी केली. त्यामुळं उत्तर दरवाज्यातून मुखदर्शनासाठी काही काळ भाविकांना प्रवेश देऊन तो नंतर बंद करण्यात आल्यानं भाविकांनी संताप व्यक्त केला. त्यातील काही भाविकांनी व्यवस्थापकांना धक्काबुक्की केल्यानंतर संस्थानच्या खासगी सुरक्षारक्षकांनी भाविकांना मारहाण केली. यात आठ ते दहा भाविक जखमी झाले आहेत. भाविकांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याबाबत भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
काय प्रकार घडला : देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे. श्रावण महिना सुरू असल्यानं दररोज लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत. त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढल्यानं मंदिर विश्वस्तांनी देणगी दर्शन बंद करून मुखदर्शन सुरू केलं. उत्तर दरवाज्यातून प्रवेश देऊन पश्चिम दरवाज्यातून बाहेर पडण्याची व्यवस्था केली. मात्र अचानक केलेल्या व्यवस्थेनं भाविकांची झुंबड उडाली. त्यातून मोठी रांग लागली. त्यामुळं उत्तर दरवाजा बंद करण्यात आला. या दरवाज्यासमोर असलेले भाविक संतापले. त्यातील काहींनी बंद उत्तर दरवाज्यावर हातातील पाण्याच्या बाटल्या आणि जोरदार धक्के दिले. त्यामुळं आतील सुरक्षारक्षक आणि व्यवस्थापक चिडून बाहेर आले. व्यवस्थापक समीर वैद्य यांना तिथं भाविकांनी धक्काबुक्की केल्यानं सुरक्षारक्षकांनी काठ्यांनी भाविकांना भर रस्त्यात मारहाण केली. त्यात आठ ते दहा भाविक जखमी झालेत. त्यामुळं परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
सुरक्षारक्षकांनी लाठीमार केला : “सुरक्षारक्षकांनी भाविकांना मारहाण केल्यानं तणाव निर्माण झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठल्याही स्वरूपाची तक्रार प्राप्त झाली नव्हती. भाविकांना धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, याबाबत लेखी तक्रार नसल्यानं कोणतीही कारवाई करण्यात आला नाही,” असं त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी सांगितलं.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





