बीड पोलीस प्रशानसनाच्या वतीनं आज नशामुक्ती मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. या मॅरेथॉनला जिल्हाभरातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला.
बीड : पोलीस प्रशासनाच्या वतीने आज (17 ऑगस्ट) शहरात नशामुक्ती मॅरेथॉन आयोजित केली जात आहे. या मॅरेथॉनमध्ये बाईक रॅलीसह जनजागृती रॅली, 5 आणि 10 किलोमीटर धावण्याची स्पर्धा आणि इतर विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तरुण व्यसनाधीन होत असल्याचं चिंताजनक वास्तव पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बीड पोलीस दलाने नशामुक्ती अभियानाची सुरुवात केली होती.
जिल्ह्यातील सन्मानीय व्यक्तींची उपस्थित : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवंत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिवसंग्राम संघटनेच्या ज्योती मेटे तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमांद्वारे नशेपासून दूर राहण्याबाबत जनजागृती केली जात आहे, ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्यास मदत होईल.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन काय म्हणाले? : यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितलं की, आज बीड पोलीस दलाने आयोजित केलेल्या नशामुक्ती अभियानामध्ये मी सक्रियपणे सहभागी झालो आहे. बीडकरांनी या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे. मी बीडकरांना आवाहन करतो की, नशामुक्त बीड करण्यासाठी आपल्याला सातत्यानं प्रयत्न करायला हवं. हा एक दिवसीय कार्यक्रम नाही, तर यापुढे प्रत्येकानं या मोहिमेचा दूत बनून समाजात या संदेशाचा प्रचार करावा. पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बॅनरवर आरोपींचा किंवा जेलमध्ये असलेल्या व्यक्तींचे फोटो लावणे टाळावे, कारण हे बीडकरांसाठी शोभा देणारे नाही. नाहीतर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिला.
‘बीडमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो’ : यानंतर पोलीस पोलीस अधीक्षक नवनीत कॉवंत यांनी सांगितलं की, “या मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद लाभला आहे. यामधून स्पष्टपणे दिसून येतंय की लोकांना बीडला नशामुक्त करायचं आहे. बीडकरांचा या अभियानाला खूप मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे, आम्हाला विश्वास आहे की आम्ही बीडला नक्कीच नशामुक्त करू शकू. समाज आणि पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आम्ही बीडमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये क्राईम रेट कमी झालेला आहे आणि हे एक महत्त्वाचं यश आहे. गैरकृत्य नियंत्रित करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली, तर आम्ही आणखी सकारात्मक परिणाम साधू शकतो. तुम्ही दिलेली माहिती गुप्त ठेवली जाईल, आणि त्या माहितीवर त्वरित कारवाई केली जाईल”. सोबतच, “महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी गठित करण्यात आली आहे. तपास सध्या सुरू आहे, त्याबद्दल अधिक माहिती देता येणार नाही. एसआयटी पूर्ण मेहनतीनं तपास करत आहे”, असंही पोलीस अधीक्षक नवनीत कॉवंत यांनी स्पष्ट केलं.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





