गेल्या चौदा वर्षांत अडीच हजार भटक्या प्राण्यांना जगण्याची नवी संधी देणारी संस्था म्हणून ‘वसा’ अमरावतीत ओळखली जातेय.
अमरावती : रस्त्यावर अनेकदा अंगावरून वाहन गेलं, तर किंचकणारी कुत्र्याची पिल्लं, वाहनाची धडक लागल्यावर तुटलेला पाय घेऊन तडफडणारी एखादी गाय… अशा विविध दुखःद प्रसंगात तडफडणाऱ्या किंवा वेदनेनं विव्हळणाऱ्या मुक्या जीवांना उपचार मिळावा, यासाठी या मुक्या जीवांच्या अंगावरून प्रेमाचा हात फिरवत शहरातील तरुणाई त्यांच्या उपचारासाठी पुढं सरसावलीय. वयाच्या एकवीस, बावीस वर्षांत मुक्या प्राण्यांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून आधार देण्याचा तरुणांचा हा प्रयत्न पुढं त्यांच्या आयुष्याचा वसा बनलाय. तरुणांच्या या कामातून आज ‘वसा’ या नावानं मुक्या प्राण्यांना आधार देणारी सामाजिक संस्था स्थापन झालीय.
अडीच हजार भटक्या प्राण्यांना जीवनदान : ‘वसा’ सामाजिक संस्था म्हणजे मुक्या प्राण्याचं दुःख, त्यांच्या भावना अगदी आपल्या बाळाप्रमाणं समजून घेऊन त्यांनाही जगण्याची संधी, जगण्याचा आधार देणारी संस्था आहे. गेल्या चौदा वर्षांत अडीच हजार भटक्या प्राण्यांना जगण्याची नवी संधी देणारी संस्था म्हणून ‘वसा’ अमरावतीत ओळखली जातेय. तर पशु प्रेमातून निमार्ण झालेल्या पशु सेवेचा हा वसा नेमका कसा? याबाबत “z24news”चा हा स्पेशल रिपोर्ट…..
अशी झाली सुरूवात : अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यात येणाऱ्या उत्तमसरा गावातील युवक शुभम सायंके आणि त्याचा लहान भाऊ भूषण हे दोघं अमरावती शहरात महाविद्यालयीन शिक्षणासाठी रोज गावातून येत. यादरम्यान रस्त्यावर अपघातग्रस्त कुत्र्यांना, गाईंना ते पाणी पाजत. हळूहळू मुक्या प्राण्यांवर त्याचं प्रेमच जडलं. रस्त्यात आजारी कुत्र्या मांजरांना ते आपल्या घरी आणायला लागले. त्यांची होईल तशी सुश्रुषा करून त्यांची काळजी घेत. निखिल फुटाणे हा त्यांचा मित्र पण त्यांच्या या प्राणी सेवेत सहभागी झाला.
घरातच पहिलं केंद्र केलं सुरू : 2011 सालातले ते दिवस होते. त्याच काळात वसा सामाजिक संस्थेची शुभम सायंके यांनी स्थापना केली. शहरात कुठं वन्यप्राणी शिरला आणि त्याला पकडण्यासाठी वन विभागाची मोहीम राबविली जात असेल, तर त्या मोहिमेत ‘वसा’ सामाजिक संस्थेचे युवक सहभागी व्हायला लागले. 2014 मध्ये पहिल्यांदा सायंके यांच्या उत्तमसरा या गावात आपल्या घरातच प्राणीसेवेचं पहिलं केंद्र सुरू केलं. त्याठिकाणी 47 प्राण्यांना ठेवण्याची क्षमता होती. अमरावती शहरात अडचणीत सापडलेल्या प्राण्यांना गावातील केंद्रात ठेवलं जात होतं.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





