हैदराबाद-रायपूर खासगी बसची ट्रकला धडक, लहान मुलींसह सहा प्रवासी जखमी
गोंदिया : हैदराबादहून छत्तीसगडमधील रायपूरकडे प्रवाशांना घेऊन जात असलेल्या एका खासगी बसची ट्रकला धडक बसली. या घटनेत बसमधून प्रवास करणारे सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून यात एका सहा महिन्याच्या मुलीचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बसच्या चालकाचं ट्रकला ओव्हर टेक करताना नियंत्रण सुटल्यानं बसनं ट्रकला धडक दिली. ही घटना बुधवारी (27 ऑगस्ट) सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास कोहमारा-नवेगावबांध मार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली गावाजवळ घडली.
ट्रकला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न : प्रत्यक्षदर्शींच्या मते, रायपुर येथील पुष्पराज ट्रॅव्हल्स कंपनीची सी.जी. 08 बीबी 3720 क्रमांकाची खासगी बस प्रवाशांना घेऊन हैदराबादवरून रायपूरकडे जात होती. यावेळी बसमध्ये 32 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, कोहमारा-नवेगावबांध मार्गावर चिखली गावाजवळ बस चालकानं समोरील ट्रकला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात बस चालकाचं स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटलं. त्यामुळं भरधाव बसची ट्रकच्या मागील भागात जोरदार धडक बसली. ज्यामध्ये बसमधील सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले.
जखमी प्रवाशांची नावं : या घटनेनंतर चिखली गावातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेत डुग्गीपार पोलिसांना याबाबत माहिती दिली. तसंच सर्व जखमी प्रवाशांना 108 रुग्णवाहिकेतून सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अरुणा नरसिंग नेताम (35) रा. बालोद जि. रायपूर, दिव्यांशी पतिराम अनताम (वय 6 महिने) रा. बालोद जि. रायपूर, चंद्रभान श्यामसिंग चतुर्वेदी (34) रा. लोटमपूर जि. रायपूर, फग्नीबाई टिकूमसिंग भुवारिया (45) रा. संजनीया जि. राजनांदगाव, घनश्याम सुहालाल पटले (41) रा. राजनांदगाव, सरिता भागवत पटले (30) कवर्धा जि. रायपूर अशी या घटनेतील जखमी प्रवाशांची नावं आहेत.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू : घटनास्थळी सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी प्रवाशांसोबत असलेल्या नातेवाईकांनी सांगितलं की, सदर सर्व प्रवासी हे हैदराबाद इंथ बांधकामाचं काम करतात आणि ते गणपती सणानिमित्त आपल्या मूळ गावी निघाले होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





