लालबागच्या राजाचा यंदाचा दरबार तिरुपती बालाजीच्या सुवर्ण राजमुकुटात बसवण्यात आला आहे. त्यासाठी खास सुवर्ण गजानन महाल साकरण्यात आलं आहे.
मुंबई : गणेशोत्सव म्हणजे मुंबईचा आत्मा! मुंबईकर मागील वर्षभरापासून ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण आज आलाय. भाद्रपद शुक्ल चतुर्थीनिमित्त घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मुंबईतील गणेशोत्सवाचा वेध घेत ‘ईटीव्ही भारत’ची टीम पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनाला. नवसाला पावणारा गणपती म्हणून या बाप्पाची जगभर ख्याती आहे. यंदा मंडळानं 92 व्या वर्षात पदापर्ण केल्यामुळं आयोजनाचं स्वरुप अगदी भव्य दीव्य दिसून येतंय. यंदा पहिल्यांदाच 50 फुटी देखावा सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलाय. ‘गजद्वार’ असं या दरवाजाला नाव देण्यात आलंय. हेच लालबागच्या राजाचं मुख्यद्वार म्हणून ओळखलं जातं.
तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात सजला लालबागचा राजा : यंदा लालबागचा राजा तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात सजला आहे. गणरायाचं राणी गुलाबी रंगातलं मखमली धोतर आणि श्रीवारी नमम असलेलं अंगवस्त्र खूपच सुंदर आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना सोनेरी खांब, हत्ती आणि मूषकाच्या शिल्पांनी सजलेला हा ‘सुवर्ण गजानन महाल’ म्हणजे नजरेचा ठाव! कुंभार संतोष कांबळी यांनी मोठ्या मेहनतीनं ही भव्य मूर्ती घडवलीय. सोन्याच्या पादुका आणि राजमुकुटानं सजलेला हा गणपती भक्तांना मोहित करतोय.
मखमली पडदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक : लालबागचा राजा 50 फूट उंच भव्य एसी मंडपात विराजमान आहे. ज्याला अनंत अंबानी यांनी प्रायोजित केलंय. या मंडपासमोरचा मखमली पडदा खास आहे. कारण तो उत्तर प्रदेशातील मुस्लिम कारागीर मोहम्मद आमीर खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 4 दिवस मेहनत करून बनवलाय. हा 50 फूट उंच आणि 8 फूट रुंद पडदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देतोय. 1934 मध्ये कोळी समाज, गिरणी कामगार आणि व्यापाऱ्यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे.
1 कोटी भाविक दर्शन घेणार : लालबागचा राजा म्हणजे नवसाचा गणपती! त्यामुळं नवस करणाऱ्या भक्तांची इथं गर्दी उसळते. यंदा 1 कोटीहून अधिक भक्त दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी 272 हाय-टेक ‘एआय’ कॅमेरे बसवलेत. जे गर्दी, संशयास्पद हालचाली आणि गुन्हेगारांवर लक्ष ठेवतील. एकंदरीत लालबागचा राजा हा फक्त उत्सव नाही, तर मुंबईची सांस्कृतिक ओळख आहे. तिरुपती बालाजीच्या थीममध्ये सजलेला हा गणपती मुंबईकरांसह राज्यातील करोडो भाविकांना दर्शनासाठी खुणावतोय.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





