-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : बुधवारा सुर्जी परिसरातील नेताजी गणेश उत्सव मंडळ हे शहरातील एक जुने व प्रतिष्ठित मंडळ म्हणून ओळखले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळात मोठ्या जल्लोषात व भक्तिभावाने गणरायाचे आगमन करण्यात आले.
सकाळपासूनच भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ढोल-ताशांचा गजर, “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणेशमूर्तीचे स्वागत करण्यात आले. मूर्ती मंडपात विराजमान होताच परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.
मंडपाची आकर्षक सजावट, रोषणाई आणि प्रकाशयोजना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. यंदा मंडळाने पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच स्वच्छता मोहीम व सामाजिक उपक्रम हे मंडळाचे वैशिष्ट्य ठरणार आहेत.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत दररोज भक्तीगीत, भजन, कीर्तन यांचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव केवळ धार्मिक मर्यादेत न राहता सर्व वयोगटांसाठी आनंदाचा आणि एकतेचा सोहळा ठरणार आहे.
नेताजी गणेश उत्सव मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून भक्तिभावाबरोबरच सामाजिक जाणीवेची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे हा उत्सव बुधवारा सुर्जीकरांसाठी अभिमानाचा व प्रेरणादायी ठरत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





