गणपती विसर्जनासाठी मुंबईकर सज्ज! तगडा पोलीस बंदोबस्त तैनात, सहकार्य करण्याचं भक्तांना आवाहन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईतील गणपती विसर्जन मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे. लाखो भक्त यात सहभागी होत असतात. विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.

 

मुंबई : विद्या आणि कलांची देवता म्हणून लाडक्या गणपती बाप्पाकडं पाहिलं जातं. गेल्या दहा दिवसापासून गणपती बाप्पा विराजमान आहेत. शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. मुंबईत अनेक मोठमोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. मुख्यतः दक्षिण मुंबईत मोठी मंडळं आहेत. या गणपती बाप्पांचं विसर्जन मुंबईतील गिरगाव चौपाटीवर होणार आहे. या गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्यामुळं आता गिरगाव चौपाटी विसर्जनासाठी सज्ज झाली आहे.

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात : गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर तयारी करण्यात आली असून, यासाठी मुंबई पोलीस, मुंबई वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, पालिका प्रशासन, बेस्ट आदी विभागातील अधिकारी, कर्मचारी येथे काम करताहेत. तर दुसरीकडे येथे पोलीस सुरक्षा यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे. पोलिसांना आपल्या ड्युटीसाठी पारदर्शकता आणि सुलभता यावी यासाठी एक बारकोड तयार करण्यात आला आहे. तो बारकोड स्कॅन केल्यानंतर आपली कोणत्या स्पॉटला ड्युटी आहे, हे त्यांना कळणार आहे. त्यामुळे विसर्जनावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, मुंबई वाहतूक पोलीस, पालिका प्रशासन, बेस्ट, अग्निशमन दल आदी विभागाकडून जोरदार तयारी करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन दळवी यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिली.

 

नागरिकांनी सहकार्य करण्याचे पोलिसांचे आवाहन : गणपती विसर्जनानिमित्त मुंबईमध्ये मिरवणुका काढण्यात येतात. विसर्जनाच्या दिवशी मोठया प्रमाणात भाविक विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होत असतात. यावेळी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त, मार्गदर्शनानुसार पोलीस सह आयुक्त यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पोलीस सह आयुक्त, वाहतुक यांच्या देखरेखीखाली वाहतूक नियमनाकरीता बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलीस आयुक्त विभागाने दिली आहे. तसेच विसर्जन मिरवणुकांदरम्यान गर्दीच्या ठिकाणी संयम दाखवून पोलिसांना सहकार्य करावे, नागरिकांनी नियमांचे भान ठेवून गणेशोत्सव विसर्जन उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करावा. गरज पडल्यास पोलीस हेल्पलाईन नंबर 100/112 येथे संपर्क साधावा, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

 

 

कसा असणार पोलीस बंदोबस्त? :

  • किमान 10 अप्पर पोलीस आयुक्त
  • 37 पोलीस उप आयुक्त
  • 61 सहायक पोलीस आयुक्त
  • 2990 पोलीस अधिकारी
  • 17558 पोलीस अंमलदार
  • सी.ए.पी.एफ. प्लाटून
  • एस.आर.पी.एफ. प्लाटून
  • जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी)
  • दंगल नियंत्रण पथक
  • अॅण्टी ड्रोन पथक तसेच होमगार्डस्

वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल : गणपती बाप्पाचे विसर्जन असल्यामुळे मुंबईतील जी मोठी मंडळं आहेत, जसे लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपतींच्या मिरवणुकीसाठी पंधरा ते वीस तास लागतात. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल केले आहेत. पर्याय मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत. तसंच काही ठिकाणी गाड्या पार्क करण्यास व जड वाहनांना मनाई करण्यात आली. गिरगाव चौपाटी या ठिकाणी जाण्यासाठी भायखळा, नागपाडा, काळबादेवी, डी.बी. मार्ग वाहतूक विभागातून लालबाग राजा व मोठ्या गणपतींची विसर्जन मिरवणूक निघते. त्यामुळे दक्षिण वाहतूक विभागांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहेत.

 

 

 

विभागनिहाय बंद असलेले रस्ते :

  • दक्षिण विभागातील 39 रस्ते बंद
  • मुख्य मध्य विभागातील 19 रस्ते बंद
  • पूर्व उपनगरे विभागातील 7 रस्ते बंद
  • पश्चिम उपनगर विभागातील 19 रस्ते बंद

उपनगरातही पोलीस यंत्रणा तैनात : मुंबईप्रमाणे उपनगरातही मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. वाहतूक शाखेतील दक्षिण, मध्य मुख्य, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर विभागात एकूण सहाय्यक पोलीस आयुक्त ते पोलीस शिपाई तीनहजार मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. यासोबत एन.एस.एस, नागरी संरक्षण दल, वाहतूक रक्षक, रस्ता सुरक्षा दल रक्षक, हॅम रेडिओ, अनिरूद्धास अॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट, होमगार्ड, जल रक्षक दल व इतर असे चार हजार मनुष्यबळ विसर्जनाच्या मदतीसाठी तैनात असणार आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013509
error: Content is protected !!