बारु गावा शेजारील सिंचन तलावाची भिंत फुटली; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) धारणी : धारणी तालुक्यातील बारु गावालगत असलेल्या सिंचन तलावाची भिंत दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता अचानक फुटली. तलावातील साठवलेले पाणी वेगाने बाहेर पडल्याने नदीसारखा महापूर आला आणि परिसरातील शेतजमिनी व उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बारु गावापासून जवळ असलेला हा सिंचन तलाव जिल्हा परिषद मृदा व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील असून, त्याचे बांधकाम सन १९७७-७८ मध्ये करण्यात आले होते. तब्बल पन्नास वर्ष जुना झालेला हा तलाव फक्त कागदोपत्री दुरुस्त करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. २०१३-१४ मध्ये व्हीआयडीपी अंतर्गत लाखो रुपयांचा निधी वापरून दुरुस्ती करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्ष काम न झाल्यानेच ही दुर्घटना घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी करून महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.
तलाव फुटल्याने सोयाबीन, मका, भात व तूर या पिकांचे शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. “आम्ही बँकेचे कर्ज फेडू तरी कसे?” अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत. नुकसान भरपाईशिवाय तग धरणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या दुर्घटनेसाठी मृदा व जलसंधारण विभागाचे उपअभियंता जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाईची मागणी केली आहे. “ही दुर्घटना टाळता आली असती,” असा सूर जनतेतून उमटत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013509
error: Content is protected !!