जुहू बीचवर ‘हॅम रेडिओ’सह विशेष टीमची नियोजनात प्रशासनाला बहुमोल मदत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईत गणेश विसर्जनाला  सुरुवात झाली आहे. तर मुंबई ॲमेच्युअर रेडिओ इंस्टीट्यूट  तर्फे हॅम रेडिओची एक विशेष टीम जुहू बीचवर नियोजनाचं काम करतेय.

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात आज 10 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन  होत आहे. पश्चिम उपनगरातील सर्वात मोठ विसर्जनस्थळ असलेल्या जुहू चौपाटीवर मुंबई ॲमेच्युअर रेडिओ इंस्टीट्यूट तर्फे हॅम रेडिओची एक विशेष टीम नियोजनाचं काम करत आहे. स्वयंसेवकांची ही टीम मुंबई पोलीस, पालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाला गर्दीचं नियंत्रण करण्यात मोलाची मदत करते.

जुहू बिचवर हॅम रेडिओ टीमची प्रशासनाला साथ : मुंबई ॲमेच्युअर रेडिओ इंस्टीट्यूट तर्फे हॅम रेडिओची एक विशेष टीम जुहू बीचवर नियोजनाच काम करतेय. 17 जणांची ही टीम आपल्या हॅम रेडिओसह पोलीस आणि पालिका प्रशासनाला नियोजनाच्या कामात बहुमोल मदत करताना पाहायला मिळते.

 

हॅम रेडिओ म्हणजे काय? : हॅम रेडिओ ही एक परवानाधारक रेडिओ सेवा आहे. संपर्क स्थापन करण्यासाठी यात रेडिओ लहरींचा वापर केला जातो. हॅम रेडिओ सेवा मोठ्या प्रमाणात शैक्षणिक आणि माहितीच्या क्षेत्रात किंवा आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करण्यासाठी वापरली जाते. काही खास फ्रिक्वेन्सी, ट्रान्सीव्हर आणि अँटेना वापरून, प्रशिक्षित हॅम ऑपरेटरद्वारे दोन परवानाधारक हॅममध्ये संवाद साधता येऊ शकतो. हा संवाद स्थानिक, जागतिक आणि अवकाशातही करता येऊ शकतो. भारतात, कायद्यानं 12 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला हॅम रेडिओ चालवण्याची परवानगी आहे. त्याकरता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची एक परीक्षा दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला हा परवाना दिला जातो. या हौशी रेडिओ ऑपरेटर्सना हॅम्स म्हणून ओळखलं जातं. ‘हॅम रेडिओ’ हा शब्द हौशी रेडिओच्या या छंदाचं वर्णन करण्यासाठीच वापरला जातो.

आपत्कालीन परिस्थितीत सर्वात प्रभावी वापर : आजच्या मॉर्डन युगात एकमेकांशी संपर्क साधण्याचं तंत्रज्ञान अति प्रगत झालेलं असलं तरीही, रेडिओ हा संपर्काच्या बाबतीत सर्वात विश्वासार्ह आणि स्थिर माध्यमांपैकी एक आहे. दुर्गम आणि कोणतंही नेटवर्क नसलेल्या भागात संपर्क साधण्याचं हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. युद्धजन्य परिस्थिती, भूकंप, चक्रीवादळ, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळं पारंपरिक संपर्क साधण्याचे मार्ग तुटले जातात, तेव्हा हॅम रेडिओ हे सर्वात प्रभावी माध्य ठरलंय. भारतात, साल 2001 मधील भूजचा भूकंप, साल 2004 मध्ये हिंदी महासागरात आलेली त्सुनामी असो की, साल 2013 मध्ये उत्तराखंडमधील प्रलयंकारी पूर अशाच प्रकारच्या विध्वंसक नैसर्गिक आपत्तींमध्ये संपर्क साधण्याचे सारे मार्ग बंद होतात तेव्हा हॅम रेडिओचा वापर झाल्याची उदाहरणं आहेत.

हॅम रेडिओनं जगातच नाही तर अवकाशातही संपर्क साधता येऊ शकतो : सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेली ही सर्वात शक्तिशाली आणि सर्वात लांब पल्ल्याची रेडिओ सेवा आहे. हॅम रेडिओ ऑपरेटर काही फ्रिक्वेन्सी बँडवर 1500 वॅट्सपर्यंतची वीज वापरू शकतात. सामान्यपणे विनापरवाना वापरल्या जाणाऱ्या वॉकी टॉकी रेडिओ हे FRS वर चालतात, ज्यात जास्तीत जास्त फक्त 2 वॅट्सची वीज वापरली जाते. त्या तुलनेत हॅम रेडिओ हे 750 पट अधिक शक्तिशाली असतात. ज्यांच्या सहाय्यानं आपण केवळ देशातच नाही तर जगात कुठेही इतकंच काय तर प्रसंगी अवकाशातही संपर्क साधू शकतो.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013509
error: Content is protected !!