एप्रिल ते ऑगस्ट 2025 या कालावधीतील मध्य रेल्वेच्या विविध तिकीट तपासणी पथकांनी 17.19 लाख फुकट्या प्रवाशांना अवैध प्रवास करताना पकडलं आहे.
मुंबई : लोकांना चांगला आणि आरामदायी प्रवास देण्यासाठी भारतीय रेल्वे आपल्या विविध रेल्वे विभागात अनधिकृत आणि फुकट्या प्रवाशांना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. यात आता मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑगस्ट 2025 या कालावधीतील डेटा जारी केला असून, या कालावधीत मध्य रेल्वेच्या विविध तिकीट तपासणी पथकांनी 17.19 लाख फुकट्या प्रवाशांना अवैध प्रवास करताना पकडलं आहे. या प्रवाशांना आकारण्यात आलेल्या दंडाच्या माध्यमातून मध्य रेल्वेनं 100.50 कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल केल्याचं रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं म्हटलं आहे.
13.78 कोटी रुपये दंड म्हणून वसूल : मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2025 मध्ये मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी विना तिकीट प्रवास करणाऱ्या 2.76 लाख प्रवाशांकडून दंड वसुली करण्यात आली. तर, ऑगस्ट-2024 मध्ये ही दंड वसुली संख्या 2.34 लाख होती. ऑगस्ट 2025 मध्ये 13.78 कोटी रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला आहे. तर, ऑगस्ट 2024 मध्ये ही रक्कम 8.85 कोटी रुपये होती. आता तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्यानं दंड वसुलीत 55 टक्क्यांनी वाढ झाल्याचं मध्य रेल्वेनं म्हटलं आहे.
मुंबई फुकट्या प्रवाशांच्या संख्येत आघाडीवर : स्वप्नांचे शहर असलेली मुंबई फुकट्या प्रवाशांच्या संख्येत आघाडीवर असून, खेदाची बाब म्हणजे दिवसेंदिवस अशा प्रवाशांची संख्या सतत वाढत आहे. मध्य रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आकडेवारी जारी केला आहे. ही आकडेवारी एप्रिल ते ऑगस्ट 2025 पर्यंतची आहे. मध्य रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई विभागात एकूण 7.03 लाख फुकट्या प्रवाशांकडून 29.17 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला असून, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भुसावळ विभागात 4.34 लाख फुकट्या प्रवाशांकडून 36.93 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागपूर विभागात 1.85 लाख फुकट्या प्रवाशांकडून 11.44 कोटी रुपये तर, पुणे विभागात 1.89 लाख फुकट्या प्रवाशांकडून 10.41 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सोलापूर विभागात 1.04 लाख फुकट्या प्रवाशांकडून 5.01 कोटी रुपये तर, मुख्यालयात 1.04 लाख फुकट्या प्रवाशांकडून 7.54 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
अधिकृत तिकीट घेऊन प्रवास करण्याचं आवाहन : मध्य रेल्वेनं हे विशेष तिकीट तपासणी अभियान आपल्या सर्व विभागांमध्ये अधिक प्रभावीपणे राबवल असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली आहे. मुंबई आणि पुण्यासह इतर विभागातील मेल/एक्सप्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, विशेष गाड्या आणि उपनगरीय गाड्यांमध्ये अशा मोहिमा राबवण्यात आल्या आल्याचं डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितलं. तसंच आपला वेळ वाचवण्यासाठी प्रवाशांनी देखील वैध अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करण्याचं आवाहन डॉ. स्वप्नील नीला यांनी केलं आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





