मराठा आरक्षण जीआरबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. तसंच त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला.
मुंबई : मराठा आरक्षण जीआरला ओबीसी नेत्यांकडून विरोध होत आहे. छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा या जीआरवर आक्षेप घेतला. त्यामुळं पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटण्याची शक्यता आहे. आम्ही देखील छगन भुजबळ यांना जशासतसे उत्तर देऊ, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत जीआरबाबत माहिती दिली.
ओबीसी नेत्यांनी जीआर नीट वाचावा : “सरकारनं जो मराठा आरक्षण जीआर काढला तो कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही. ज्यांच्याकडं पुरावा आहे, कुणबी पुरावे आहेत, त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता हा जीआर मदत करतो. त्यामुळं कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीने योग्य ती भूमिका मांडू, मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो की, आपण जीआर नीट वाचा, कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही. कायद्याने पुराव्यानिशी जे लोकं अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं हा जीआर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही,” असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा जीआरवर दिलं.
मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही : ओबीसींचा महामोर्चा निघणार आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “मला असं वाटतं की, अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाहीय. वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते. त्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय जीआर काढला आहे ते सांगतो. तेव्हा त्यांचं समाधान होतं. आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादं काम करायचं असेल तर त्याला आपण थांबू शकत नाही. सामाजिक दृष्टीने मी एवढं नक्की सांगतो की, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही.”
विरोधकांवर हल्लाबोल : शिवसेना – उबाठा महिला आघाडी रविवारी ‘सिंदूर रक्षा’ हे आंदोलन करणार आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरच पलटवार केलाय. “अलीकडच्या काळात जो काही विरोधी पक्ष आहे, त्यांनी विरोधाची अशी पातळी गाठली आहे की, ते समाजविरोधी, देशविरोधी असल्यासारखी भूमिका घेतायेत. त्यांनी सरकारच्या कामांना, योजनांना, पॉलिसींना नक्की विरोध करावा, पण समाजाचा आणि देशाचा विरोध करणं हे योग्य नाहीय. ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल,” अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेध : शिवाजीनगर स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी असं नामांतर करण्याचा कर्नाटक सरकारने निर्णय घेतलाय. “याचा मी निषेध करतो. एकप्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं काम हे कर्नाटकचे काँग्रेस सरकार करतंय. याचं मला दुःख आहे, पण मला याचं नवल वाटत नाही. कारण छत्रपती शिवरायांना अपमानित करण्याची परंपरा ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असल्यापासून आहे. त्यापूर्वीही स्वातंत्र्यपूर्व काळात डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं होतं, त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्या प्रकारचं मत व्यक्त केलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. तीच परंपरा महाराजांना अपमानित करण्याची ही सातत्याने काँग्रेसच्या सरकारमध्ये दिसत आहे. आम्ही याचा निषेध करतो. छत्रपती शिवराय यांचं नाव बदलून कुठेतरी धार्मिक विरोधी व्यवस्था उभी करायची, निर्माण करायचं हे त्यांचं सुरु आहे. त्यामुळं त्यांना सुबुद्धी मिळावी,” असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केलाय.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





