अमरावती – “प्रभावी संवाद हा यशस्वी शैक्षणिक वातावरणाचा पाया असतो” या संदेशाला अधोरेखित करत अक्षर मानव अमरावती व वर्धा जिल्हा कार्यकारिणी तर्फे श्री. सोमनाथ विद्यामंदिर, उमरी (ता. कारंजा-घाडगे, जि. वर्धा) येथे 16 सप्टेंबर रोजी ‘विद्यार्थी संवाद’ (युवा संवाद) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेचा 43 वा वर्धापन दिन तसेच ओझोन जनजागृती दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सतीकृपा शिक्षण संस्था, वर्धा चे संचालक मा. श्री. अरुणराव ढोले यांनी भूषविले. तर अक्षर मानव संघटनेचे महाराष्ट्र राज्य संघटक तथा विदर्भाचे पालकमंत्री श्री. आझाद जमा खान प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. खान यांनी सांगितले की, “आयुष्यात उंच भरारी घ्यायची असेल तर शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचे संस्कार यांचा सन्मान केला पाहिजे. विद्यार्थी आदर्श जीवन जगले तर समाज प्रगतीपथावर वाटचाल करेल.”
यावेळी प्रांजली ताई आत्राम (सुप्रसिद्ध महिला समुपदेशक, लेखिका व कवयित्री) यांनी विद्यार्थिनींना मानसिक, शैक्षणिक समस्यांबाबत संवाद साधण्याचे महत्त्व पटवून दिले. तर जिल्हा सचिव सौ. अश्विनी वितोंडे-खान यांनी “योग्य ध्येय निश्चित करून प्रामाणिक परिश्रम घेण्याची हीच वेळ आहे” असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षीय भाषणात अरुणराव ढोले यांनी “जे काम राजकीय नेत्यांनी करावे ते अक्षर मानव संघटना करत आहे. ‘निव्वळ माणूस म्हणून जगा’ हा विचार समाजाला नवी दिशा देणारा आहे.” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धांमध्ये विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
वक्तृत्व स्पर्धा: प्रथम – कु. अक्षरा चोपडे व कु. नीलम गोहते, द्वितीय – कु. पल्लवी कामतकर.
भक्तीगीत गायन: प्रथम – कु. श्रावणी घागरे, द्वितीय – चि. मयुर मेंढे.
प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. राजकुमार तिरभाने यांनी केले. सूत्रसंचालन कु. नीलम गोहते व कु. प्रतिक्षा काळभुत यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली ठाकरे-ढोले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





