-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी – अंजनगाव सुर्जी येथील प्राथमिक सीताबाई संगई शाळेचे मुख्याध्यापक अनिल जूनघरे यांना यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मिळालेला हा सन्मान संपूर्ण तालुका व परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
मुख्याध्यापक जूनघरे यांनी शैक्षणिक क्षेत्रासोबतच स्वच्छता अभियान, वृक्षसंवर्धन, शिस्त-अनुशासन, गीत गायन, तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केलेले कार्य उल्लेखनीय मानले गेले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये हसत-खेळत शिक्षणाची गोडी निर्माण केली तसेच शासनाच्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली.
याच कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, त्याचे वितरण दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी टाटा थिएटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
जूनघरे यांनी शाळेत आदर्श शैक्षणिक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली मेहनत खरच प्रशंसनीय असल्याचे शिक्षणविभागाने मान्य केले आहे.
या यशाबद्दल स्थानिक नागरिक, पालक, शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा योग्य गौरव आहे,” अशा भावना व्यक्त करण्यात येत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





