अमरावती : ज्या मुलीच्या अपहरणाप्रकरणी आरोपी मुलगा आधीच कारागृहात बंद आहे, त्याच मुलीचे त्या मुलाच्या वडिलाने अन्य तीन सहकाऱ्यांच्या साथीने पुन्हा अपहरण केले. जुन्या प्रेमप्रकरणातून २ सप्टेंबर रोजी ती घटना घडली. याप्रकरणी चांदुर रेल्वे पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी अपहूत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अजय, शाम, संतोष व उज्वल (सर्व रा. अचलपूर) यांच्याविरुद्ध २६ सप्टेंबर रोजी अपहरणाचा गुन्हा नोंदविला.
चारही आरोपींनी आपल्या मुलीला जुन्या कारणावरून पळवून नेले, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. यापूर्वी देखील ३१ जुलै दरम्यान त्या १७ वर्ष १० महिने वयाच्या मुलीला पळवून नेण्यात आले होते. त्यावेळी चांदुर रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तिचा शोध घेऊन तिला ६ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यावेळी प्रज्वल (रा. अचलपूर) यास तिच्या अपहरणाबाबत अटक देखील करण्यात आली होती. तूर्तास तो न्यायालयीन कोठडीअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. नेमका तो राग मनात धरून प्रज्वलचा वडील संतोष याने तीन सहकाऱ्यांसमवेत तिचे अमरावतीहून अपहरण केले. २ सप्टेंबर रोजी ती मुलगी चांदूर रेल्वे येथील एका मंदिरामध्ये गेली. उशिरा रात्रीपर्यंत घरी न पोहोचल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला होता.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





