ग्रामीण भागातील 192 जातीवाचक वस्त्यांची आणि 25 जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अशी नावे बदलणारा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे.
सिंधुदुर्ग: ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून आता जातीवाचक नावाऐवजी महापुरुषांची नावे देण्यात आली असून, ग्रामीण भागातील एकूण 192 जातीवाचक वस्त्यांची आणि 25 जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अशी नावे बदलणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे.
जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतचा शासन निर्णय : ग्रामीण भागातील केवळ वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची कार्यपद्धती शासन निर्णयान्वय निश्चित केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण 192 जातीवाचक वस्त्यांची आणि 25 जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्याकरिता ग्रामसभेचा ठराव पास करून त्याबाबतचे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले होते. सदर प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आलेले होते.
192 वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जुनी जातीवाचक नावे बदलणार : शासन निर्णयान्वये जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 192 वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जुनी जातीवाचक नावे बदलण्यासाठी ग्रामसभेत ठरावही मांडण्यात आलेला होता. आता शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार जातीवाचक नावे बदलून नवीन प्रस्तावित नावांना मान्यता देण्यात आलेली आहे.
जातीवाचक नावं बदलणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा : सिंधुदुर्ग प्रशासनाकडून जलद प्रक्रिया राबवून ही नावे बदलणे झाल्याने पालकमंत्री नितेश राणे यांनीही सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा जातीवाचक नावं बदलणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे.आता काही नावे शिल्लक राहिली असतील तीसुद्धा नावे बदलण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार ही नावे बदलण्यात आली असली अनेकांनी नितेश राणे यांचे अभिनंदन केले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





