महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं राज्याच्या निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे उपस्थित होते.
मुंबई : महाविकास आघाडी व मनसेच्या शिष्टमंडळानं आज मंगळवारी (14 ऑक्टोबर) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली आहे. यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासहस्ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शकपणे पार पाडाव्या, यासंदर्भात निवेदन देण्यात आलं.
बुधवारी पुन्हा होणार भेट : “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष शरद पवार, शिवसेना – उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील, माकपचे अजित नवले, समाजवादी पार्टीचे रईस शेख, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली. मात्र, या भेटीतील काही चर्चा अद्याप अपूर्ण आहेत. उद्या पुन्हा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या समवेत शिष्टमंडळाची संयुक्त बैठक होईल. त्यानंतर पत्रकार परिषद होईल,” अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांची उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
नाशिकमध्ये साडेतीन लाख बोगस मतदार : दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यापूर्वी शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा दावा करत निवडणूक आयोगावर ‘जोकरगिरी’ करण्याचा आरोप केला होता.
काय म्हणाले राऊत? : पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की, मुंबई आणि ठाण्यात बोगस मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तर नाशिकमध्ये साडेतीन लाख बोगस मतदार असल्याचा त्यांनी दावा केला. राऊत पुढे म्हणाले, “निवडणुकीत मतं कशी येतात, कशी वाढतात, हे आम्ही आयोगाला दाखवणार आहोत. विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसला, आता महापालिका निवडणुकीत असा फटका बसू नये, यासाठी आम्ही आयोगाला भेटत आहोत.” त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत VVPAT प्रणाली का वापरली जात नाही? असा प्रश्नही उपस्थित केला.
मनसे महाविकास आघाडीत येणार का? : यावेळी पत्रकारांनी राज ठाकरे यांची मनसे महाविकास आघाडीत सामील होणार का? असादेखील प्रश्न विचारला. यावर राऊत म्हणाले, “हा प्रश्न तुम्ही राज ठाकरेंना विचारा. मनसे आणि शिवसेना अनेक मुद्द्यांवर एकत्र आहे. बाकी ज्यांना पाहिजे ते आमच्यासोबत येतील.”
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





