सर्व दवाखाने हाउसफुल्ल, व्हायरल तापाचे रुग्ण वाढले
अचलपूर ताप, सर्दी, खोकला यांसारख्या व्हायरल आजारांनी अचलपूर शहर परिसरात थैमान घातले असून अचलपूरचे उपजिल्हा रुग्णालय रुग्णांनी हाउसफुल्ल झाले आहे.अचलपूर शहरातील जवळपास सर्वच घरांमध्ये सर्दी-पडसे, ताप याचे रुग्ण दिसून येत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात दररोज हजारांवर रुग्ण ओपीडीला येत आहेत. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, उपजिल्हा रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयेसुद्धा रुग्णांनी हाऊसफुल्ल आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिवसा गर्मी आणि रात्री थंडी यामुळे सर्दी-पडसे, ताप आजारांचे रुग्ण वाढत आहे. त्यातच आता हगवण, अतिसार यांसारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दूषित पाणी व अस्वच्छ अन्नामुळे तसेच वातावरणाच्या लहरीपणामुळे व्हायरल इन्फेक्शन खूप वाढले आहे. खासगी मेडिकलमधूनही व्हायरल इन्फेक्शन सर्दी, ताप-खोकला या रोगांच्या औषधी विक्रीमध्ये वाढ झालेली आहे. अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्ण व ओपीडी रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे.
परिसर, हात ठेवा स्वच्छ पावसाळ्यात पाणी आणि अन्न बाहेरचे घेतल्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे नागरिकांनी उकळलेले व शुद्ध पाणी प्यावे तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. साधे अन्न खावे. शिळे अन्न खाऊ नये, असा सल्ला वैद्यकीयतज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या उपजिल्हा रुग्णालयात तापाचे, सर्दी-खोकल्याचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत. दिवसा गर्मी आणि रात्री थंडी असल्यामुळे रुग्ण आढळून येत आहेत. दररोज हजारच्या वर रुग्ण येत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
– डॉ. सुरेंद्र ढोले, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





