नमुने पाठवणार मुंबईतील प्रयोगशाळेत, नॅशनल फूड लॅबोरेटरीमध्ये होणार तपासणी, शहरात चर्चेला ऊत
वरूड : रविवारी दुपारी १२ च्या सुमारास तांदळाने भरलेला एक ट्रक सातपुडा जिनिंगच्या आवारात आढळून आला होता. चौकशी करून ट्रक शासकीय गोदामात जप्त करून ठेवला. चार दिवस लोटूनसुद्धा पुढील कारवाईला वेग आलेला नाही. आता तांदळाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याचे पुरवठा अधिकाऱ्याने सांगितले.
सातपुडा जिनिंगच्या आवारात रविवारी तांदळाचे २५० पोते भरलेला एक ट्रक उभा असल्याची माहिती तहसीलदार रामदास शेळके यांना मिळाल्यावरून पुरवठा अधिकारी निखिल नलावडे, प्रमोद दुधे, मंडळ अधिकारी सोळंके, मिसाळ यांनी पंचनामा केला. तांदळाचे नमुने तपासणीकरिता पाठवून ट्रक ताब्यात घेऊन शासकीय गोदामात ठेवला. परंतु, चार दिवस लोटूनसुद्धा कारवाई झाली नाही.
जिल्हा पुरवठा विभागाकडून बुधवारी तहसीलदार यांना पत्र पाठवून तांदुळाचे नमुने नॅशनल फूड लॅबोरेटरी, मुंबईला पाठविण्याचे सूचित केले. यामुळे अहवाल आल्यावरच कारवाई करण्यात येईल, असे पुरवठा अधिकारी निखिल नलावडे यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणात राजकीय आणि शासकीय दबाव वाढल्याने तांदूळ तस्करांना संरक्षण मिळाल्याची खमंग चर्चा आहे. त्यामुळे कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





