अंबाडा : जिल्हा परिषद शाळा गेल्या काही वर्षापासून ग्रामीण भागातील शिक्षणाच्या क्षेत्रात प्रेरणादायी बदल घडवतांना दिसून येत आहेत. पूर्वी जिथे तुटलेली बाके, गळती छप्पर आणि मर्यादित साधनसामग्री असायची, तिथे आज प्रकाशमान वर्गखोली, स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर, संगणक सुविधा आणि प्रशस्त शाळा परिसर विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळतो आहे. शाळेत आता सीबीएससी पाठ्यक्रम सुरू असून, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता शिक्षणाचा अनुभव देखील मिळत असल्याचे दिसून येत आहे.
केवळ शिक्षणाचे केंद्र नाही तर भविष्यातील नेतृत्व, जबाबदारी, प्रगतीचा पाया रचणारी प्रेरणास्थाने जिल्ह्यात एकूण १ हजार ५५७जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. यापैकी ‘पीएम श्री’ योजनेंतर्गत सुमारे ३०० शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासह शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शाळेतील वर्गखोलींना रंगीत भिंती, विज्ञान प्रकल्प, चित्रकला आणि प्रेरणादायी संदेशांनी सजवण्यात आले आहे. या ‘बोलक्या भिंती’ विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला चालना देतात. विशेष म्हणजे, मेळघाट भागातील शाळांनीही या बदलांची साथ देत आदर्श घडवला आहे. कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही तिथल्या शाळा आधुनिक सुविधा आणि नवनवीन उपक्रमांमुळे ग्रामीण शिक्षणाला बळकट करीत आहेत. खेड्या-पाड्यात शिक्षण पोहचविण्यात जिल्हा परिषदेच्या शाळा महत्वाच्या आहेत.
जिल्हा परिषद शाळेत त्याकाळी साधने कमी होती; पण शिक्षकांची निष्ठा आणि मार्गदर्शन अपार होतं. त्यांनी आम्हाला केवळ शिक्षण दिलं नाही, तर आत्मविश्वास, शिस्त आणि मेहनतीचे बळ दिले. या शाळा आधुनिक झाल्या आहेत.
ईश्वर सरोदे, माजी विद्यार्थी
मोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ग्रामीण शिक्षणाचा चेहरामोहरा बदलत आहेत. आता आमचे उद्दिष्ट प्रत्येक शाळा ‘स्मार्ट शाळा’ बनविण्याचे आहे. त्यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील आहे.
नितीन उंडे, गटशिक्षणाधिकारी, मोर्शी
आमच्या काळात शाळेत फळा-खडू आणि काही बाकं एवढ्याच सुविधा होत्या. पण, आता प्रशासन खरंच शिक्षणाकडे गंभीरपणे लक्ष देत आहे.
सुरेश झाडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





