अमरावती : दीपावली अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली असताना, नांदगाव पेठ पोलिसांनी रहाटगाव भागात दडलेल्या तिघांकडून २६ हजार ५०० रुपये किमतीचे ५०० रुपयांचे बनावट चलन जप्त केले.
रहाटगाव येथील वृंदावन कॉलनी येथे १५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते ६:३० च्या कालावधीत ती कारवाई करण्यात आली. तेथून तिघांना पकडण्यात आले. दिवाळीच्या तोंडावर अमरावतीच्या बाजारपेठेत बनावट चलनाची घुसखोरी तर झाली नसावी ना, अशी शंका या कारवाईमुळे उपस्थित झाली आहे. संचित चव्हाण (१९, रा. रहाटगाव प्लॉट), दीपक खंडारे (३२, रा. पंचशील नगर, रहाटगाव) आणि संघरत्न मोटघरे (३६ वर्षे, रा. जुनी वस्ती, रहाटगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्या बनावट नोटा आदित्य किशोर रामेकर (वय २५, रा. समर्थवाडी, रहाटगाव) याने बाजारात वापरण्यासाठी दिल्या होत्या, अशी कबुली आरोपी संचित चव्हाण याने नांदगाव पेठ पोलिसांना दिली.
कुणाकडे किती नोटा ?
संचित चव्हाण याच्याकडे ५००रुपयांच्या २६, दीपक खंडारेकडे १५ व संघरत्न मोटघरे याच्याकडे १२ अशा मिळून एकूण २६ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. याप्रकरणी, पोलिस अंमलदार नीलेश साविकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
जप्त नोटांचे निरीक्षण केले असता त्यावर आरबीआयचा लोगो व वॉटरमार्क दिसला नाही. त्या नोटांना पाण्याने पुसले असता रंग निघत असल्याचे दिसून आले. यावरून या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. फरार आदित्य रामेकरचा शोध घेत आहोत.
दिनेश दहातोंडे, ठाणेदार, नांदगाव पेठ.
यापूर्वीही घडले प्रकार मे २०२४ मध्ये येथील दोन बँकेत भरल्या गेलेल्या ५०० रुपयांच्या २८ नोटा बनावट आढळून आल्या होत्या. जानेवारीत चांदूर रेल्वे येथे १०० रुपयांच्या ३१ बनावट नोटा आढळल्या. त्यात एलसीबीने सातारा जिल्ह्यातील कन्हाड तालुक्यातून दोघांना अटक केली होती, हे विशेष.
नोटा बनावटच ५०० रुपयांचे बनावट चलन बाळगणाऱ्या तिघांना अटक केली. आदित्य रामेकर याने ते बनावट चलन बाजारात चालविण्यासाठी, व्यवहारासाठी दिले असल्याची माहिती समोर आली. त्यादृष्टीने पोलिसांनी त्याचा कसून शोध चालविला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





