अमरावती सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिवळे पडले व कीड, रोगांचा अटॅक झाला. त्यामुळे उतारा घटला. शासन मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता पीक विम्यावरच आहे. पीक कापणी प्रयोगावर सर्व अवलंबून राहणार आहे.
यंदा आठ तालुक्यांत वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने व अन्य तालुक्यात संततधार पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. पीक विम्याच्या माध्यमातून मिळणारा परतावा शेतकऱ्यांसाठी आधार ठरणार आहे. सध्या सुरू असलेल्या पीक कापणी प्रयोगातून नुकसान निष्पन्न होत असल्याने विम्याचा परतावा मिळू शकेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
शासनाने तीन हेक्टर मर्यादेत जिरायती पिकांना हेक्टर १८५०० रुपये, हंगामी बागायतसाठी २७ हजार रुपये, तर बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी ३२५०० रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. मात्र ही मदत अतिवृष्टी झालेल्या भागातच मिळेल. अन्य भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या परताव्याची प्रतीक्षा आहे.
किती आहे हेक्टरी विमा कवच ?सोयाबीन पिकासाठी हेक्टरी ५५ हजारांवर रुपयांचे विमा कवच आहे. १०० टक्के नुकसानऐवजी बदलतल्या निकषानुसार सरासरी नुकसान ग्राह्य धरून एकच रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
८०-११० फॉर्म्युल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा विमा कंपन्या निश्चित झालेली भरपाई देण्यास दरवर्षीच विलंब करतात. मात्र, यावेळी ८०-११० या फॉर्म्युल्यामुळे ही वेळ येणार नाही व शेतकऱ्यांना यावर्षीच्या प्रतिकूल परिस्थितीत परतावा मिळण्याची शक्यता आहे.
पीक कापणीला निम्मे भारांकन यावर्षी इतर निकष काढून पीक कापणी प्रयोगाद्वारे सिद्ध होणाऱ्या नुकसानास निम्मे भारांकन आहे, तर उपग्रह छायाचित्राद्वारे निष्पन्न होणाऱ्या नुकसानास निम्मे भारांकन आहे. कृषी व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्लॉटवर जाऊन लक्ष ठेवत आहेत.
मंडळनिहाय असेल वेगळी रक्कम पीक विमा निश्चित करताना कापणी प्रयोग, उपग्रह छायाचित्रांद्वारे नुकसानीचे प्रमाण निश्चित केले जाते. हे प्रमाण मंडळनिहाय वेगळे असू शकेल. प्रमाण ठरवताना त्या मंडळातील उंबरठा उत्पन्नाशी तुलना होईल.
पीक कापणी प्रयोग काय सांगतात ?
एखाद्या मंडळात ४०-५० टक्के नुकसान निष्पन्न झाल्यास तेथे शेतकऱ्यांना २३ ते २९ हजारांपर्यंत भरपाई मिळू शकते. नुकसानीच्या प्रमाणानुसार विम्याचा परतावा मिळण्याची शक्यता आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





