-सचिन इंगळे (प्रतिनिधी) : नागरिकांना दररोज पिण्याचे पाणी पुरवणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आता निधीअभावी ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. मागील एका वर्षापासून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी आवश्यक निधी मिळालेला नसल्याने कंत्राटदारांनी १७ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळपासून पाणीपुरवठा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
???? मागील वर्षभर निधीप्रश्न अनुत्तरीत
या योजनेअंतर्गत पंप व पाईपलाईन दुरुस्ती, यंत्रसामग्री देखभाल आदी कामांसाठी वारंवार निधी मागणी करण्यात आली होती. मात्र विभागाकडून निधी मंजूर न झाल्याने कंत्राटदारांना मजुरांचे वेतन, यंत्रसामग्री खर्च आणि साहित्य खरेदी अशक्य झाल्याचे सांगण्यात आले. परिणामी त्यांनी कामबंदीचा निर्णय घेतला आहे.
???? जिल्हाभर पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता
या निर्णयाचा फटका अमरावती शहरासह दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा या शहरांबरोबरच ग्रामीण भागातील १०५, १५६ आणि ७९ गावे यांना बसणार आहे. त्यामुळे सुमारे १५ लाख नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
???? आश्वासनानंतरही निधी न मिळाल्याचा आरोप
कंत्राटदार संघटनेच्या म्हणण्यानुसार, विभागीय कार्यालयाकडून “निधी लवकर मिळेल” असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आजतागायत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे १७ ऑक्टोबरपासून मजुरांना थांबविणे आणि १७ ऑक्टोबरपासून सर्व कामे बंद ठेवणे असा निर्णय घेण्यात आला आहे.
???? ठिय्या आंदोलनाने घेतले वेगळे वळण
या मागणीसाठी आज १६ ऑक्टोबर २०२५ रोजी अमरावती येथील पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी शासकीय कंत्राटदार निलेश चिलात्रे, धनंजय बंड, किशोर काळे, मंगेश चिलात्रे, विठ्ठलराव कांचनपुरे, देवानंद माकोडे, प्रदीप जोशी, प्रदीप राजस, अशोक बहिरे, शुभम गवळी, अविनाश राऊत, अनिकेत कतोरे, संकेत भेले, सुनिल हरणे, सचिन इंगळे, कार्तिक शेंडे यांच्यासह शेकडो कामगार उपस्थित होते.
???? प्रशासनावर तातडीने उपाययोजनेचा दबाव
नागरिक व जनप्रतिनिधींनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, तातडीने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन जिल्हाभर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






