-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर : दर्यापूर तालुक्यातील राजकारणात नव्या युवा चेहऱ्याची दमदार एन्ट्री होण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे एकनिष्ठ व आक्रमक युवा नेते अंकुश कावडकर हे पंचायत समिती दर्यापूर सर्कल, थीलोरी येथून शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
अंकुश कावडकर हे लहानपणापासूनच शिवसेनेच्या विचारसरणीशी घट्टपणे जोडले गेले आहेत. त्यांच्या कुटुंबाचा शिवसेनेशी जुना आणि स्नेहपूर्ण संबंध आहे. त्यांच्या आजोबा मामासाहेब कावडकर हे त्या काळचे आमदार प्रकाश भारसाकळे यांचे निकट सहकारी होते. त्या काळी भारसाकळे आपले भाषण सुरू करण्यापूर्वी मामासाहेब कावडकर यांचे प्रभावी भाषण ऐकलेच पाहिजे, अशी परंपरा होती, अशी आठवण आजही ज्येष्ठ शिवसैनिक सांगतात.
या राजकीय आणि समाजकारणाच्या परंपरेतूनच वाढलेले अंकुश यांनी अल्पवयातच संघटनात्मक कार्यात स्वतःला झोकून दिले. अवघ्या १८ व्या वर्षी गणेशपूर युवासेना उपजिल्हाप्रमुख (दर्यापूर व मेळघाट मतदारसंघ) अशी जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. शेतकरी, विद्यार्थी आणि कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलने करून आपला आक्रमकपणा आणि लोकहिताचा ध्यास सिद्ध केला.
त्यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची अमरावती जिल्हा युवासेना प्रमुख म्हणून नियुक्ती केली. यापूर्वी ते विश्व मानव अधिकार सुरक्षा संघाचे जिल्हा महासचिव म्हणून कार्यरत होते.
जनतेच्या प्रश्नांवर तत्काळ प्रतिसाद देण्याची वृत्ती, कामातील पारदर्शकता आणि समाजकार्याची आवड या गुणांमुळे अंकुश पाटील कावडकर हे दर्यापूर तालुक्यातील तरुणांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. आता ते पंचायत समिती निवडणुकीत “निर्णयक्षम, आक्रमक आणि जनतेच्या पाठीशी असलेला युवा नेता” म्हणून मैदानात उतरले असून, या निवडणुकीकडे केवळ शिवसेना नव्हे तर संपूर्ण दर्यापूर तालुक्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






