मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक सेंट जॉर्जेस रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अॅड. तुषार भोसले यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार (आरटीआय) अर्जातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी जवळपास अर्ध्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. अॅड. तुषार भोसले यांच्या म्हणण्यानुसार, सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे एमडी आणि रेसिडेंट डॉक्टर्स आयसीयूमध्ये काम करण्यास तयार नसल्यामुळं ही स्थिती निर्माण झाली आहे. तसंच काही डॉक्टर ड्युटी टाळतात, तर काही दोन रुग्णालयामध्ये काम करून दुहेरी पगार घेतात. याशिवाय, आयुर्वेद आणि होमिओपॅथिक इंटर्न्सना आयसीयूमध्ये ड्युटीवर लावलं जातं, असा आरोप करत हे अत्यंत धोकादायक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
40.75 टक्के रुग्णांचा मृत्यू : अॅड. तुषार भोसले यांनी आरटीआयद्वारे मिळवलेल्या आयसीयू-02 या अहवालातील आकडेवारीनुसार, मे 2022 ते जुलै 2025 या सेंट जॉर्जेस रुग्णालयातील आयसीयूमध्ये एकूण 1276 रुग्ण दाखल झाले, त्यापैकी 520 रुग्णांचा मृत्यू झाला म्हणजेच साधारण 40.75 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. तर 169 रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले. काही काळासाठी तर मृत्यूदर जवळपास 48.76 टक्के इतका नोंदला गेला, म्हणजेच प्रत्येक दोन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
डीएमईआरकडे तक्रार : दरम्यान, या प्रकरणामुळं सेंट जॉर्जेस रुग्णालयातील वैद्यकीय पायाभूत सुविधा, कर्मचारी उपलब्धता आणि प्रशासकीय पारदर्शकतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अॅड. तुषार भोसले यांनी यांनी सांगितलं की, “रुग्णालयानं बायोमेट्रिक हजेरी लागू न केल्यानं गैरव्यवहाराचा संशय आहे. 30 दिवसांत उत्तर मिळालं नाही म्हणून ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार केली असून, ही तक्रार सध्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांकडे (डीएमईआर) चौकशीअंतर्गत दाखल आहे. तसंच अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं मुंबईतील सर्वात जुन्या सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूची स्थिती ही राज्य वैद्यकीय व्यवस्थेवरील विश्वासाला आव्हान देणारी ठरत आहे,” असं मत अॅड. तुषार भोसले यांनी व्यक्त केलं आहे.
रुग्णालयाकडून सुधारित आकडेवारी : दुसरीकडे, सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या प्रशासनानं दिलेल्या सुधारित अहवालात आयसीयू-02 मध्ये मे 2022 ते जुलै 2025 दरम्यान एकूण 2152 रुग्ण दाखल झाल्याचं सांगितलं असून त्यापैकी 520 मृत्यू आणि 169 रुग्ण उपचार अर्धवट सोडलेले आहेत. म्हणजेच चार वर्षांत जवळपास 40 टक्के मृत्यूदर कायम आहे. याबाबत सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितलं की, “आज रुग्णालयातर्फे आयसीयूमध्ये झालेल्या मृत्यूबाबतची सुधारित आकडेवारी दिली आहे. याआधी दिलेल्या आकडेवारीमध्ये सेंट जॉर्जेस रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना ज्या रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं होतं. त्यांची आकडेवारी देण्यात आली नव्हती. आज रुग्णालयाकडून दिली गेलेली आकडेवारी योग्य आहे.”
| सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई – WD-02 आयसीयू मृत्यू आकडेवारी (मे 2022 – जुलै 2025) | |||||
| वर्ष | कालावधी | दाखल रुग्ण | इतर वॉर्डमधून आलेले | एकूण आयसीयू रुग्ण | एकूण मृत्यू |
| 2022 | मे 2022 – डिसेंबर 2022 | 201 | 118 | 319 | 80 |
| 2023 | जानेवारी 2023 – डिसेंबर 2023 | 357 | 230 | 587 | 136 |
| 2024 | जानेवारी 2024 – डिसेंबर 2024 | 476 | 326 | 802 | 186 |
| 2025 | जानेवारी 2025 – जुलै 2025 | 242 | 202 | 444 | 118 |
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





