भारतीय महिला क्रिकेट संघानं उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन महिला वनडे विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
नवी मुंबई : जेमिमा रॉड्रिग्जच्या शानदार आणि स्फोटक खेळीमुळं भारतीय महिला क्रिकेट संघानं वनडे विश्वचषकात सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनं पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं महिला वनडे विश्वचषक 2025 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. हा ऐतिहासिक सामना 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी इथं होणार आहे. त्या सामन्यातही पावसाचा धोका आहे. अशा परिस्थितीत, जर पावसामुळं अंतिम सामना रद्द झाला तर कोणता संघ ट्रॉफी जिंकेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
फायनलच्या दिवशी नवी मुंबईतील हवामान कसं असेल? : महिला वनडे विश्वचषक 2025 चा अंतिम सामना 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी इथं खेळवला जाईल, जिथं टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाशी सामना करेल. अंतिम सामन्यावर पावसाचं सावट आहे. अॅक्यूवेदरच्या हवामान अंदाजानुसार, रविवारी नवी मुंबईत दमट परिस्थिती अपेक्षित आहे, दुपारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2 नोव्हेंबर रोजी येथील तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसंच पावसाची शक्यता 63 टक्के आहे, तर वादळ येण्याची शक्यता 13 टक्के आहे. या दिवशी पावसाच्या बातमीनं टीम इंडियाचा ताण वाढला आहे.
सामना रद्द झाला तर कोण विजेता होईल? : जर 2 नोव्हेंबर रोजी पावसामुळं हा सामना रद्द झाला तर आयसीसीनं त्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. अंतिम सामना 3 नोव्हेंबर रोजी पुन्हा खेळवता येईल. परंतु जर दोन्ही दिवशी सामना खेळवला गेला नाही तर दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेचा विजेता घोषित केलं जाईल. कारण दक्षिण आफ्रिकेनं पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियाच्या वरच्या स्थानावर स्थान मिळवलं आहे, ज्याचा सामना रद्द झाल्यास त्यांना फायदा होईल. शिवाय, आफ्रिकन संघानं लीग टप्प्यात भारताचा पराभव केला, ज्यामुळंही ते स्पर्धेचे विजेते बनतील. भारतीय चाहत्यांना प्रार्थना करावी लागेल की पावसाचा अंतिम सामन्यावर परिणाम होऊ नये.
रविवारी मिळणार नवा विश्वविजेता : भारताचा सामना आता दक्षिण आफ्रिकेशी होईल, जो पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. परिणामी इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम फेरीत खेळणार नाही. एकूणच, ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सनं पराभूत करुन, भारतानं केवळ अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं नाही तर एक नवीन इतिहास लिहिला आहे. आता, त्यांना 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला हरवून एक नवीन अध्याय लिहिण्याची संधी आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





