मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 नोव्हेंबरच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मतदारांसह सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं. त्याचबरोबर त्यांनी किल्ल्यावर होणाऱ्या नमो सेंटरला विरोध केला आहे.
मुंबई – 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकांना या मोर्चात मोठ्या संख्येनं सामील होण्याचं आवाहन केलं आहे. मोर्चा आझाद मैदान येथे होणार असल्यानं तिथे गाड्या लावण्यासाठी जागा नाही. त्यामुळे ‘मी देखील ट्रेनने मोर्चासाठी येणार’ असे राज ठाकरे यांनी आजच्या मेळाव्यात जाहीर केलं आहे. ते आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “मी अनेक वर्ष ओरडून सांगतोय. लोक आपल्याला मतदान करत आहेत. पण, मतदार यादीतील घोळ आणि ईव्हीएम मशीनमधील घोळ या सगळ्या भानगडीमुळे आपल्याला पराभव पत्करावा लागतोय. हे असे सत्तेत यायचे आणि मग हवी तशी सत्ता राबवायची हेच सुरू आहे. अजून एक वर्ष लागला तरी चालेल. मतदार याद्या स्वच्छ करा. त्यानंतर ज्यांचा पराभव होईल, ते मान्य असेल. आज सत्तेवर असलेल्या लोकांचा विजय झाला तरी आम्हाला मान्य आहे. मॅच फिक्स आहे. मॅच फिक्सिंग केल्यानंतर अझीरूद्दीनपासून सगळ्यांना काढून टाकलं होतं. पण यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही.”
सुट्टी टाकून मेळाव्यात या. बॉस सुट्टी देत नसेल तर शनिवार पुरते एक मत त्याच्या गालावर द्या. तुमचा बॉसदेखील मतदार आहे. त्यालादेखील मोर्चासाठी घेऊन या-मनसे अध्यक्ष- राज ठाकरे
सेंटर उभं केलं की फोडून टाकणार- लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विविध मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. मात्र, निवडणूक आयोगानं ती माहिती खासगी असल्याचं सांगत सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यास नकार दिला होता. यावरदेखील राज ठाकरे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “मतदार कसला प्रायव्हेट असतो? त्याचे मतदान खासगी असू शकतं. अशा भानगडीत निवडणूक जिंकायच्या? आपण आपला सगळा स्वाभिमान किती गहाण टाकायचा. याला काही मर्यादा आहे का नाही? एकनाथ शिंदे यांच्या विभागानं मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात विविध ठिकाणी नमो टुरिझम केंद्र सुरू करण्याचा शासन निर्णय काढला आहे. हे टुरिझम केंद्र कुठे सुरू करणार? तर, राजगड आणि शिवनेरी अशा महाराजांच्या किल्ल्यांवर टूरीझम सेंटर काढत आहेत. मी आता सांगतोय, सेंटर उभं केलं की फोडून टाकणार आहोत. मला मुख्यमंत्री करा, म्हणून किती चाटूगीरी करायची? सत्ता डोक्यात गेली की काय होत? ते पहा. मुंबईतल्या जागा, अदानी जिथे बोट ठेवेल त्या जागा देत आहेत.”
मोर्चा दणक्यात झाला पाहिजे- “मी महाराष्ट्रातील सर्व मतदारांना सांगतोय. एक नोव्हेंबरच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि दाखवून द्या की तुमच्या मनात राग किती आहे? मतदारांचा अपमान आहे. हे सगळे सुधारलं पाहीजे. या देशातील निवडणुका योग्य पद्धतीनंच झाल्या पाहिजेत. हे ईव्हीएम मशिन जगात कुठंच वापरलं जात नाही. आज ही अमेरिकेत बॅलेटवर निवडणुका होतात. हे मी एकटा म्हणतोय असं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा म्हटले होते. त्यांचा व्हिडीयोदेखील माझ्याकडे आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्ताच्या बंगल्याच्या पत्त्यावर 150 मतदार आहेत. हा काही पोरखेळ नाही. प्रत्येकाचा भविष्याचा मुद्दा आहे. परवाचा मोर्चा दणक्यात झाला पाहिजे. जे दुबार मतदार आहेत ते बाहेर काढले पाहीजेत. तुन्ही प्रत्येकाचा चेहरा पाहा. ही लढाई महाराष्ट्राला लढवायची आहे. मी स्वताच लोकलनं येणार आहे.” असे राज ठाकरे यांनी आजच्या मेळाव्यात म्हटलं आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





