जिल्ह्यात दुपारी मतदानाची गती वाढली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती:जिल्ह्यातील दहापैकी नऊ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उत्साहाने मतदान सुरू असून सकाळी थंडीमुळे मंदावलेली मतदानाची गती दुपारनंतर वाढली.

 

सकाळी ११.३० वाजेपर्यंत २१.३० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ३०.३४ टक्के मतदान चिखलदरा येथे झाले आहे. या निवडणुकीत मतदार आपल्या मताचा अधिकार बजावून स्थानिक प्रशासन आणि राजकीय नेतृत्व ठरवणार आहेत.

मतदानाच्या टक्केवारीबाबतही उत्सुकता आहे. अचलपूरमध्ये एकूण ९९ हजार ६५९ मतदार असून ११.३० वाजेपर्यंत २१.१७ टक्के, वरूडमध्ये २२.४० टक्के, दर्यापूरमध्ये २१.५० टक्के, मोर्शीत २१.९१ टक्के, चिखलदरा ३०.३४ टक्के, शेंदूरजनाघाट २५.३१ टक्के, चांदूर रेल्वे १६.६५ टक्के, चांदूर बाजार १९.९३ टक्के, धामणगाव रेल्वे २१.०८ टक्के, धारणी १७.८० टक्के आणि नांदगाव खंडेश्वरमध्ये २०.८७ टक्के मतदान झाले आहे. अनेक ठिकाणी मतदारांच्या लांब रागा पाहायला मिळत आहेत. नऊ वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीची उत्सुकता आहे.

या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि शिंदेसेना यांच्यात जोरदार लढाई सुरु असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना हे घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. गेले १० दिवस जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या पाच आमदारांसह अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

जिल्ह्यातील अचलपूर, वरूड, मोर्शी, दर्यापूर, चिखलदरा, शेंदूरजनाघाट, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे या नगरपालिका आणि धारणी, नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे.

एकूण ३ लाख १२ हजार ४३६ मतदार ११ अध्यक्ष आणि २४३ सदस्यांना स्थानिक सत्तेची सूत्रे सोपवणार आहेत. यासाठी ६४ उमेदवार अध्यक्षपदासाठी, तर १०४८ उमेदवार नगरसेवकपदांसाठी रिंगणात आहेत.

११ पालिका-नगर पंचायतींच्या १४१ प्रभागांमध्ये एकूण ३६६ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १२५२ अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानासाठी ५११ कंट्रोल युनिट, ९९७ बॅलेट युनिट आणि ५२४ पॉवर पॅक सज्ज ठेवण्यात आले आहेत. सर्व केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था असून, अचलपूरमध्ये २९ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. अचलपूरमध्ये शांतता राखण्यासाठी ५०० पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे.राज्य निवडणूक आयोगाने विविध अपिलांवर सुनावणीस झालेल्या विलंबाचे कारण देत, अंजनगाव नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली आहे. अंजनगावसह पाच नगरपालिकांमधील आठ सदस्यपदांची निवडणूक स्थगित करण्यात आली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!