ताबोडातील वाघीण छोटी तारा प्रसिद्ध वाघिणीची ती मुलगी असून, तिचे वय साधारण दोन वर्षांचे आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अनुकूलन कुंपणात तिला सोडण्यात आलंय.
सातारा – सह्याद्री वाघ पुनर्स्थापन कार्यक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणखी एका वाघिणीचं (T7-S2) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतर झालंय. सातारा-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंजमध्ये पकडण्यात आलेल्या वाघिणीचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतर झालं आहे. ताबोडातील वाघीण छोटी तारा या प्रसिद्ध वाघिणीची ती मुलगी असून, तिचे वय साधारण दोन वर्षांचे आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अनुकूलन कुंपणात तिचं सॉफ्ट रिलीज करण्यात आलं आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानात आणून सोनारली अनुकूलन कुंपणात सोडण्यात आलं : ताडोबा-अंधारी तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पातून तीन नर आणि पाच मादी, अशा एकूण आठ वाघांच्या स्थानांतरणास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली होती. त्यानुसार टप्प्याटप्प्याने वाघांच्या स्थानांतरणास सुरुवात झाली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरात 8 डिसेंबर रोजी सायंकाळी या वाघिणीला सुरक्षितपणे पकडण्यात आलं होतं. वाघीण पूर्णतः तंदुरुस्त, निरोगी आणि स्थलांतरास योग्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिला चांदोली राष्ट्रीय उद्यानात आणून सोनारली अनुकूलन कुंपणात सोडण्यात आलं.
भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली कार्यवाही : सॉफ्ट रिलीज पद्धतीमुळे वाघीण सुरक्षित कुंपणात राहून तेथील भूभाग, भक्ष्य प्रजाती आणि स्थानिक पर्यावरणाशी हळूहळू जुळवून घेते. खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी तिचे सुरक्षित पुनर्स्थापन, नैसर्गिक हालचाल आणि क्षेत्रीय स्थैर्य अधिक प्रभावीपणे साध्य होते. भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. के. रमेश, फील्ड बायोलॉजिस्ट आकाश पाटील हे वाघिणीच्या अनुकूलन प्रक्रियेचे आणि वर्तणुकीचे शास्त्रीय निरीक्षण करीत आहेत.
वाघिणीच्या सॉफ्ट रिलीजची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली : राष्ट्रीय पातळीवर या कार्यक्रमाचे निरीक्षण व्याघ्र संवर्धन प्राधिकरण करीत असून, या मोहिमेवर व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक निरीक्षक डॉ. नंदकिशोर काळे आणि मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे लक्ष आहे. वाघिणीच्या सॉफ्ट रिलीजची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. ताडोबा-अंधारी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR) यांच्या संयुक्त पथकांद्वारे ही मोहीम राबविण्यात येत असून, त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे.
या वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‘तारा’ या नावाने ओळखले जाणार : ताडोबातून स्थानांतरीत केलेल्या T7-S2′ या वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‘तारा’ या नावाने ओळखले जाईल. ताराची वंशावळ फार समृद्ध आहे. कारण ती ताडोबात सात वेळा पिल्लांना जन्मास घालणाऱ्या छोट्या ताराची मुलगी आहे. याठिकाणी तिचा सांकेतिक क्रमांक ‘STR -T5’ असा असेल. सध्या ‘STR-T1’ (सेनापती) आणि ‘STR-T2’ (सुभेदार) हे दोन्ही नर ‘STR-T4′ (चंदा) पासून प्रत्येकी 9 आणि 25 किलोमीटरच्या परिसरात आहेत. वाघीण T7-S2’ ही कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातील तरुण, सशक्त आणि नैसर्गिकरीत्या भ्रमणशील मादी आहे. ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत स्थलांतरित होणारी ही दुसरी मादी असून, तिची उपस्थिती सह्याद्री परिसरातील वाघ संवर्धनास अधिक बळकटी देणार आहे, असंही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी सांगितलंय.
वाघ पुनर्स्थापन मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा : ताडोबामधून आणलेल्या दुसऱ्या वाघिणीचे सॉफ्ट रिलीज हा सह्याद्रीतील वाघ पुनर्स्थापन मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. चांदोली परिसरात तिला सुरक्षित अधिवास व पुरेशा प्रमाणात भक्ष्यसाठा उपलब्ध आहे. आमची क्षेत्रीय पथके व शास्त्रीय तज्ज्ञ संस्था तिच्या देखरेखीसाठी पूर्णतः सज्ज आहेत, असंही सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक तुषार चव्हाण म्हणालेत.
दुसऱ्या मादी वाघिणीचे यशस्वी पुनर्स्थापन हे कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचे प्रतीक : ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत ताडोबा आणि सह्याद्री या व्याघ्र प्रकल्पांमधील उत्कृष्ट समन्वयामुळे राज्यातील वाघ संवर्धन चळवळ अधिक भक्कम होत आहे. दुसऱ्या मादी वाघिणीचे यशस्वी पुनर्स्थापन हे आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे, असंही प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास रेड्डी यांनी म्हटलंय.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





