-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अंजनगाव-वडाळी-झाडी-शेलगाव (वडाळी) हा ग्रामीण जीवनरेषेसमान रस्ता आज अक्षरशः वेदनेचा मार्ग ठरला आहे. वर्षानुवर्षांच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून, त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. खड्ड्यांनी भरलेला, धुळीने व चिखलाने व्यापलेला हा मार्ग नागरिकांच्या दैनंदिन जगण्यावर गंभीर आघात करत आहे.
या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी, दुग्धव्यवसायिक, रुग्णवाहिका, गर्भवती माता व अत्यावश्यक सेवा वाहने दररोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. अनेक अपघातांनी या रस्त्याची भयावहता अधोरेखित झाली असतानाही प्रशासनाची उदासीनता कायम आहे. साधा प्रवासही कठीण झाल्याने परिसरातील नागरिकांचे हाल वाढले असून, संताप आता उघडपणे व्यक्त होऊ लागला आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्री, खासदार, आमदार तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने देण्यात आली. प्रस्ताव मंजूर झाल्याचे आश्वासन दिले गेले; मात्र प्रत्यक्षात “निधी उपलब्ध नाही” या एका वाक्यावर सगळी प्रक्रिया थांबली. परिणामी वडाळी परिसरातील जनता प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहे.
या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार केला आहे. प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी रोजी रस्ता रोको, उपोषणासह तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात सर्व गावांतील नागरिक, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात निवेदन देताना रमेश सावळे, रवी भिवगळे, बालचंद खोब्रागडे, सुरेश मेश्राम, बाळासाहेब इंगळे, अरुण मेश्राम, अरुण गुगळे, निलेश घरडे, गोपीचंद पानतावणे, अरविंद मेश्राम, सुरेश ढोणे, विजय डोंगरे आदी ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“रस्त्याची तातडीने दुरुस्ती झाली नाही, तर लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन केले जाईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.”
दरम्यान, प्रशासनाने वेळीच दखल घेऊन तात्काळ निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा प्रजासत्ताक दिनी होणारे आंदोलन अटळ असल्याचा ठाम इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com










