अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे (Ajit Pawar Death Plane Crash) रिक्त झालेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातील (Baramati assembly constituency) जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदणीकृत असलेले मतदार या पोटनिवडणुकीत मतदान करण्यास पात्र असतील.
अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर बारामती विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 अन्वये बारामती विधानसभा मतदारसंघासाठी हा विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदारयादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक राहावी, या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Ajit Pawar Baramati By-Election: प्रारूप मतदारयादी 9 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार
या कार्यक्रमानुसार एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवार 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त झालेल्या दावे व हरकतींची छाननी करून त्या 6 मार्च 2026 पर्यंत निकाली काढण्यात येतील.
10 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवार 10 मार्च 2026 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या अंतिम यादीच्या आधारे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, या प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तसेच मतदान केंद्रांची यादी तयार करताना स्थानिक स्तरावर सुसूत्रता राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत राजकीय पक्षांना संपूर्ण कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येऊन आवश्यक सूचना व सूचनांचे आदानप्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





