अमरावती : शहरातील फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील राहुलनगर बिच्छू टेकडी परिसरात रविवारी रात्री १०च्या सुमारास एका अश्रुधूर नळकांडीमुळे मोठी खळबळ उडाली. फुटलेल्या नळकांडीतून निघणाऱ्या धुरामुळे घरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर रस्त्याने जाणाऱ्यांच्या डोळ्यांत आग होऊ लागल्याने सर्वत्र धावपळ झाली. सुमारे दोन तास तो हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. अखेर रात्री १२ च्या सुमारास सारे काही कुतूहलापोटी झाले, या निष्कर्षाप्रत पोहोचून पोलिसांनी त्यावर पडदा टाकला.
१५ वर्षीय मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी एसआरपीएफच्या व्हॉलीबॉल मैदानावर गेला होता. तिथे त्याला एक नळकांडी सापडली. त्याने ती घरी आणली. रात्री १० च्या सुमारास जेवण केल्यानंतर तो त्या नळकांडीशी प्रयोग करू लागला. मात्र, अचानक ती नळकांडी फुटली. त्यातून प्रचंड धूर बाहेर पडला, ज्यामुळे स्थानिक रहिवासी सैरावैरा पळू लागले आणि डोळे चोळू लागले.
खेळता खेळता फुटले पोलिसांनी खबरदारी म्हणून त्या अल्पवयीन मुलाकडे चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी शेकडो नागरिकांची गर्दी जमली होती. आपण खेळत असताना आपल्याला एक नळकांडे दिसले. कुतुहलापोटी ते नळकांडे घरी आणले. रात्री १० च्या सुमारास त्या नळकांड्यासोबत खेळत असताना त्यातून धूर निघाला, असे त्या अबोध बालकाने सांगितले.
एसआरपीएफ मैदानावर प्रात्यक्षिक केले जातात. त्यावेळी अश्रुधुराचे एखादे नळकांडे चुकून मैदानावर राहिले असावे. ते त्या अल्पवयीन मुलाने घरी आणले. रात्रीच्या सुमारास तो खेळत असताना ते फुटले. त्यामुळे अश्रुधूर निर्माण झाला. कुठलीही हानी झाली नाही.
रोशन शिरसाट,
ठाणेदार, फ्रेजरपुरा
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com








