अमरावती (प्रतिनिधी) चिखलदरा व धारणी तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत (मनरेगा) कामगारांची प्रलंबित मजुरी होळीपूर्वी अदा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अमरावती जिल्हा युवक काँग्रेसने प्रशासनाला दिला आहे.
मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये वर्क कोड ओपन करण्यावर लादलेल्या मर्यादांमुळे अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे नवीन वर्क कोड तातडीने खुले करून काम सुरळीत करण्यात यावे. मजुरी थकबाकीमुळे आदिवासी व ग्रामीण कामगार आर्थिक अडचणीत सापडले असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर त्वरित देयके अदा करणे अत्यावश्यक आहे, असे काँग्रेसने धारणी येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. तसेच चुरणी स्वतंत्र तालुका घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली असून तात्पुरत्या उपाययोजने म्हणून आठवडचातून बाजाराच्या दिवशी चुरणी व काटकुंभ येथे नायच तहसीलदारांची नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली.
वनविभाग व व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने वनपट्टाधारक आदिवासी शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नये, प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि कायद्याचे पालन याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी लेखी स्वरूपात सविस्तर खुलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com









