अमरावती शहरात तीन कोटी ११ लाख ८५ हजार रुपयांचे २ किलो ८० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले आहे. ड्रग्स तस्करीची लिंक ही मुंबई शहरासोबत जुळली असल्याची माहिती गुन्हे शाखेने केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे.
त्यामुळे विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
रविवारी (ता. आठ) नागपुरीगेट ठाण्याच्या हद्दीत लालखडी ते कुंड-सर्जापूर मार्गावरून अब्दुल फहीम अब्दुल रहीम ऊर्फ फहीम एफ. बी. (वय २५, रा. आझादनगर) व शेख अयान शेख रमजान (वय २०, रा. द्वारकानगर, अमरावती) यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सोमवारी (ता. नऊ) शेख नाझीम शेख रहीम व शेख रहीम ऊर्फ हुंगा शेख आमद (रा. गवळीपुरा, अमरावती) यांनाही अटक केली. त्यामुळे तीन कोटी ११ लाखांच्या एमडी तस्करीप्रकरणात अटक संशयित तस्करांची संख्या चारवर पोहोचली आहे, अशी माहिती सोमवारला पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नमूद चौघांव्यतिरिक्त शेख नईम ऊर्फ राजा शेख रहीम, शेख फहीम ऊर्फ सोनू शेख रहीम, शेख जमीर ऊर्फ बाबा हुंगा, शेख समीर शेख अमीर, गोलू अहेमद कुरेशी (सर्व रा. गवळीपुरा, अमरावती) व अब्बास कुरेशी (रा. चांदूरबाजार), अशा एकूण दहा जणांविरुद्ध नागपुरीगेट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेने ज्यावेळी अब्दुल फहीम व शेख अयान या दोघांना अटक करून त्यांची प्राथमिक चौकशी केली. त्यांनी दोन किलो ८० ग्रम एमडी ड्रग्स हे मुंबईवरून आणल्याची कबुली तपास अधिकाऱ्यांपुढे दिली. अमरावतीमध्ये हे ड्रग्स आठ जणांना पुरवठा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित बाबींच्या तपासाकरिता गुन्हे शाखेचे पथक मुंबईला जाणार आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





