
अमरावती : शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने ८ मे रोजी दोन सराईत घरफोड्यांना अटक केली. त्यांच्याकडून घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आणून ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घरफोड्यांचे दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. विक्की अरुण सरकटे (रा. पुष्पक कॉलनी, अमरावती) व ओम गोपाल नागरीकर (रा. छाया कॉलनी, अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या घरफोड्यांची नावे आहेत. या प्रकरणात साहिल राऊत (रा. गांधी आश्रम, अमरावती) व देवेश उमेकर (रा. पुष्पक कॉलनी, अमरावती) हे दोघे फरार आहे. शहरातील हरिशांती कॉलनी येथील रहिवासी प्रवीण पांडुरंग बनकर (४२) हे २८ एप्रिल रोजी कुटुंबासह नातेवाइकाच्या लग्नाकरिता धामणगाव रेल्वे येथे गेले होते. या काळात त्यांचे घर फोडून ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी प्रवीण बनकर यांनी २९ एप्रिल रोजी बडनेरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. गुन्हे शाखेचे युनिट-२ या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासात हा गुन्हा विक्की सरकटे याने साथीदार ओम नागरीकर, साहिल राऊत व देवेश उमेकर यांच्या मदतीने केल्याचे समोर आले. त्यानुसार विक्की सरकटे व ओम नागरीकर यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. साहिल राऊत व देवेश उमेकर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
अनेक दिवसांच्या खंडानंतर गुन्हे शाखा युनिट दोनने कारवाई केली आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीत क्राईम ब्रँचचे दोन्ही युनिट थंडावले होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






