
अमरावती : बोटांचे ठसे जुळत नाहीत म्हणून रेशन दुकानातून धान्याविना परतण्याची वेळ आता महिलांवर येणार नाही. आता आधारबेस फोर जी ई-पॉस मशीन प्रत्येक रेशन दुकानात लागत आहे. यामध्ये आय स्कॅनरची सुविधा देण्यात आल्याने स्पीड वाढीसोबतच अनेक समस्या निकाली निघणार आहे.
यापूर्वी टू जी ई-पॉसमुळे रेशन दुकानदारांसह शिधापत्रिकाधारकांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे या मशीन बदलण्यात येऊन नव्याने चांगल्या गतीच्या मशीन व आय स्कॅनरची सुविधा देण्याची मागणी रेशन दुकानदारांकडून सातत्याने केली जात आहे. आता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्वल पाथरे व अन्य धान्य वितरण अधिकारी प्रवीण राऊत यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील १,९१४ रेशन दुकानांमध्ये नवीन फोर जी ई-पॉश मशीन या आठवड्यात कार्यान्वित होत आहे. संबंधित दुकानदारांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासोबतचा गतिमानता वाढण्यासाठी शासनाने ई-पॉस यंत्रणा निर्माण केली आहे.
रेशन दुकानदार व शिधापत्रिकाधारकांना येणाऱ्या अडचणी फोर जी ई-पॉस प्रणालीमध्ये दूर झाल्या आहेत. याद्वारे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता व गतिमानता आणण्याचा प्रयत्न होत आहे.
– निनाद लांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी
ही मिळणार शिधापत्रिकाधारकांना सुविधा फोर जी ई-पॉस मशीनद्वारे आधारबेस ऑनलाइन प्रणाली तयार झाली आहे. यात दैनिक विक्री, मासिक विकी, ‘वन नेशन-वन रेशन अंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारक उपलब्ध आहेत. पोर्टेबिलिटीचीही सुविधा उपलब्ध आहे. याद्वारे कुठलाही रेशनधारक कुठल्याही रेशन दुकानातून रेशन घेऊ शकणार आहे. सअन्य सुविधांचा लाभ रेशन दुकानदार व शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






