
वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यात मागील दोन वर्षांपासून उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढला. गतवर्षी देखील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांना बेभाव किमतीने ज्वारी विकावी लागली होती. यंदादेखील तालुक्यात जवळपास पंधराशे एकरावर ज्वारीचा पेरा आहे. ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना खुल्या बाजारात बेभाव किमतीने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
सद्यस्थितीत सोंगणी झाली आहे. उत्पन्न चांगले असल्याने शेतकरी थेट बाजार समितीत चांगल्या भावाच्या अपेक्षेने जात असताना त्याला हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी मिळतात. मध्यंतरी अंजनगाव सुर्जी तालुका खरेदी-विक्री संघामार्फत ज्वारी, मका खरेदीची नोंदणीची जाहिरात झाली. परंतु, खरेदी-विक्री संस्थेला नाफेडमार्फत आयडी मिळाली नसल्याने खरेदी होऊ शकली नाही.
२२०० रुपयांना खरेदी खुल्या बाजारात २१०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल ज्वारीला भाव मिळत आहे, तर शासकीय खरेदी केंद्र उघडल्यास ३१८० रुपये हमीभावानुसार मिळतील. त्यामुळे तातडीने शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.
शासकीय खरेदी एजन्सीमार्फत ज्वारी खरेदी करण्याबाबत तहसीलदार व संबंधित प्रशासनाकडे प्राधान्याने पाठपुरावा करणे सुरू आहे. डिस्ट्रिक्ट मार्केटिंग ऑफिसमार्फत आयडी मिळताच ज्यारी नोंदणी व खरेदी केली जाईल.
गजानन धोटे,अध्यक्ष, खरेदी-विक्री संघ,
शासकीय ज्वारी खरेदी केंद्राकरिता पाठपुरावा केला जात आहे. तांत्रिक कारणांनी आयडी मिळण्यास विलंब होत आहे. आज किंवा उद्या आयडी मिळेल.
पवार, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अमरावती
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






