
अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गत सहा महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यातील लहान-मोठ्या कंत्राटदारांची विविध विकासकामांच्या देयकांपोटी सुमारे सहाशे कोटी रुपयांची रक्कम थकीत असल्याची धक्कादायक माहिती आहे. थकीत रकमेच्या किमान ४० ते ५० टक्के रक्कम मिळावी, अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे.
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर्षी अर्थसंकल्पात केवळ १८ हजार कोटींची तरतूद असताना जवळपास ६४ हजार कोटींची कामे १७ मार्च २०२४ पर्यंत मंजुरी देत त्यांच्या निविदासुद्धा पूर्ण केल्या आहेत. या प्रमुख कामांमध्ये जिल्हा, राज्य व ग्रामीण मार्गाची दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे, तसेच रस्त्यावरील खड्डे भरणे, प्रमुख शहर व तालुका, ग्रामीण भागामधील इमारती दुरुस्ती व देखभाल दुरुस्ती या सर्व कामांचा समावेश आहे. वास्तविक सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात एवढ्या कमी रकमेची तरतूद असताना पाच पटीने कामे मंजूर करण्यात आली आहेत. प्रलंबित देयकांची रक्कम त्वरेने मिळावी, अन्यथाा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा निवेदनातून साबांविच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकामचा अमरावती आणि अचलपूर विभाग तसेच विशेष प्रकल्प दर्यापूर व अमरावती अशी मिळून सुमारे जिल्हाभरातील सहाशे कोटींची रक्कम देयकांची थकीत आकडेवारी आहे.
कंत्राटदार मेटाकुटीस आले, बँक खात्याला बूड लागले सहा महिन्यांपासून छदामही मिळाली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात कामे करणारे लहान-मोठे कंत्राटदार मेटाकुटीस आले आहेत. शासनाकडून निधी आला नसल्याचे उत्तर दिले जाते. परंतु, बँकेकडून कर्ज घेतले, आजमितीला व्याज भरायलासुद्धा पैसे नाही, अशी कैफियत कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांकडे निवेदनातून मांडली आहे. कंत्राटदार प्रचड हतबल झाले आहेत. लोकसभा निवडणूक, आचारसंहिता, राजकारणामुळे सरकार वा राजकीय पक्षांचे या गंभीर प्रश्नाकडे अजिबात लक्ष नाही ही खेदाची बाब असल्याचे कंत्राटदार संघटनांचे म्हणणे आहे.
येत्या आठ दिवसात कंत्राटदारांची थकीत देयके अदा करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम व अर्थ खात्याने निर्णय न घेतल्यास राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेद्वारे प्रत्येक जिल्हा, तालुका, ग्रामीण भागात लक्षवेधी आंदोलन उभारू. राज्यात २० हजार कोटी रुपये कंत्राटदारांची देयकांची रक्कम थकीत आहे.
-अश्विन पवार, (अध्यक्ष अमरावती जिल्हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता असोसिएशन)
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






