२० शाळा, ३० अंगणवाड्यांची घेतली जबाबदारी
अमरावती : अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्थेने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील २० पेक्षा जास्त शाळा आणि जवळपास ३० अंगणवाड्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याअंतर्गत ३,२०० विद्यार्थ्यांना वर्षभराचे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वैभव वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली २०१२पासून विविध सामाजिक उपक्रम राबवणारी सेवा बहुउद्देशीय संस्था गेल्या पाच वर्षांपासून मेळघाटातील विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करत आहे.
सातपुडा पर्वतरांगेतील मेळघाटात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पुस्तके मिळतात मात्र वर्षभर लागणारे शालेय साहित्य आणि इतर आवश्यक वस्तू जंगलात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या सलोना केंद्रातील १३ आणि इतर केंद्रातील २ शाळांचे पालकत्व अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्थेने स्वीकारले आहे. संस्थेच्या वतीने याही वर्षी दऱ्याखोऱ्यात आणि पहाडाच्या उंच टोकांवर वसलेल्या १५ गावांतील शाळांच्या दारी जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. या १५ गावांमध्ये थेट शाळेच्या आवारात पोहोचून साहित्य वितरित करण्यासाठी संस्थेच्या सेवेकरांना दोन दिवस लागले. त्याशिवाय अकोला जिल्ह्यातील एक, अकोटमधील दोन तसेच जळगावातील दोन,चिखली तालुक्यातील २ शाळांच्या विद्यार्थ्यांनाही मदत करण्यात आली.
त्यामध्ये मेळघाटातील सर्वाधिक १२००, अकोल्यातील १००, अकोटमधील ३००, बुलडाणा जिल्ह्यातील २०० हून अधिक,जळगाव खानदेश मधील २०० अशा एकूण ३२०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.. विद्यार्थ्यांच्या हाती लाभलेल्या या शालेय साहित्यामुळे शिक्षकांनी देखील आनंद व्यक्त केला. प्रत्येक विषयाच्या वह्या, रजिस्टर तसेच पेन, पेन्सिल कंपास, डबा, पाटी अशा वस्तूंचा त्यामध्ये समावेश आहे.
मेळघाटातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तसेच मराठी शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी या संस्थेने पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षी १४ शाळांमधील १५०० विद्यार्थांना शालेय साहित्य वितरित करण्यात आले होते. तसेच प्रत्येक शाळेची गरज ओळखून त्यानुसार त्यांना मदतही संस्थेच्या वतीने करण्यात आली. या चौदाही शाळेतील चिमुकल्यांचे स्नेहसंमेलन देखील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. याबरोबरच प्रेरणादायी कार्यक्रम, कार्यशाळा, नवोदय तसेच शिष्यवृत्ती परीक्षांसाठी सहाय्य, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमदेखील घेतले जातात. या वर्षी राज्यस्तरीय योगस्पर्धा आयोजित केली जाणार आहे, तसेच सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धाही आयोजित करणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
गतवर्षी ज्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले होते त्यांच्या शिक्षणात खरोखर प्रगती जाणवली असल्याची माहिती सलोना केंद्राचे प्रमुख दिलीप इंगळे यांनी दिली. आता या सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांजवळ शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्यामुळे यावर्षी प्रगतीचा आलेख नक्कीच छान वाढलेला दिसेल. गतवर्षी सर्वोच्च शाळांचे एकत्रित स्नेहसंमेलन घेतले होते त्यामुळे जिल्हास्तरावर झालेल्या लोकनृत्य स्पर्धेत देखील आमच्या चौदाही शाळेतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि अनेक शाळेतील संघ जिल्हास्तरीवरील स्पर्धेत विजेते ठरले असे देखील दिलीप इंगळे म्हणाले.
समाजाचे काही देणे असते या उद्देशाने मेळघाटातील १५ शाळेचे आणि ३० अंगांवडींचे पालकत्व आम्ही आमची जबाबदारी म्हणून स्वीकारले. या संपूर्ण शाळेतील विद्यार्थी शिकावेत, गुणवत्ता वाढवत पुढे जावेत हाच आमचा हेतू आहे. जी काही मदत आमच्या वतीने मेळघाटातील विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी कामी पडेल ती आम्ही करण्याचा प्रयत्न करू, असे सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैभव वानखडे म्हणाले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






