लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची उदासीन भूमिका
अकोला : वाहनधारकांसाठी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी अकोला जिल्हा कारागृह ते अकोला क्रिकेट क्लब मैदानापर्यंत उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, हा उड्डाणपूल सध्या अकोलेकरांसाठी चांगला मनोरंजक ठरत आहे. १६५ कोटी रुपये खर्च करून उड्डाणपुलाचे पाणी वाहनधारकांच्या अंगावर पडत असल्याने अकोलेकरांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे.
उड्डाणपुलावरून सातत्याने पाण्याची गळती
अकोला शहराची गेल्या २०१६- २०१७ मध्ये हद्दवाढ झाली आहे. या हद्दवाढ कार्यक्षेत्रामध्ये १३ ग्रामपंचायती अंतर्गत २४ गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे साहजिकच शहराच्या लोकसंख्येत भर पडली असून, वाहनांच्या संख्येतदेखील भर पडली आहे. दिवसेंदिवस शहराची झपाट्याने वाढ होत आहे, त्यानुसार लोकसंख्या वाढत असताना साहजिकच वाहनांचीदेखील संख्या वाढत आहे. अशातच प्रत्येक प्रमुख मार्गावर अतिक्रमणधारकांनी ठिय्या मांडला आहे. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा झाला.
वाहनधारकांना सोसावा लागतोय मनस्ताप
हा लोकार्पण सोहळा मोठा गाजावाजा करून करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात १६५ कोटी रुपयांचा निर्मिती करण्यात आलेला अकोल्यातील उड्डाणपूल सध्या अकोलेकरांसाठी मनोरंजनात्मक आहे. उड्डाणपुलावरील आउटलेटचे पाणी थेट रस्त्यांवर गळत असल्याने अकोलेकरांना धबधब्याचा अनुभव येत आहे. आवश्यकता नसतानादेखील भाटे क्लब ते जुने बसस्थानकापर्यंत अंडरपासची निर्मिती करण्यात आली आहे. या अंडरपासमध्ये तर बाराही महिने पाणी असते हे वास्तव अकोलेकर नाकारू शकत नाही, तर अकोला जिल्हा कारागृह ते ठरत अकोला क्रिकेट क्लब मैदानापर्यंत निर्मिती करण्यात आलेला उड्डाणपूल अवघ्या काही महिन्यातच अशोक वाटिका चौकात एका साइडची बाजू पूर्णतः कोसळली होती. त्यामुळे मोठी भीषण घटनेची घटना त्यावेळी टळली होती.
तब्बल १६५ कोटींचा खर्च पाण्यात !
उड्डाणपुलासाठी करण्यात आलेल्या कामामध्ये अकोलेकरांना पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी दबली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात ‘एनएचएआय’ या यंत्रणेच्या नियंत्रणाखाली निर्मिती करण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली जी जलवाहिनी येत आहे, त्याची साधी शिफ्टिंग करू नये एवढीदेखील बाब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या तांत्रिक अधिकाऱ्याच्या लक्षात येऊ नये ही बाब आश्चर्यकारक मानली जात आहे. त्यामुळे या जलवाहिनीवरदेखील महापालिका प्रशासनाने लाखो रुपयांचा खर्च करून अखेर सदर जलवाहिनी दुसऱ्या जागेवर शिफ्टिंग केली तर त्याचा भुर्दंड महापालिका प्रशासनाला सोसावा लागला असता.
उड्डाणपुलावरील पाण्याच्या गळतीने वाहनधारक त्रस्त
अकोल्यातील उड्डाणपूल आता अकोलेकरांसाठी चांगला मनोरंजनात्मक ठरत असून, अकोलेकरांना धबधब्यांचा अनुभव शहराच्या मध्यभागी असलेल्या उड्डाणपुलाचा येत आहे. त्यामुळे अकोल्यातील लोकप्रतिनिधींच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माणझाले असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यंत्रणेसमोर लोकप्रतिनिधी हतबल तर झाले नाहीत ना? अशी शंका अकोलेकरांच्या मनात येत आहे हे नाकारू शकत नाही.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






