
कोरची : मुख्यालयापासुन 15 कि.मी. अंतरावर अल्लीटोला येथे सोमवारी काँग्रेस कार्यकर्त्या डॉ. शिलू चिमुरकर यांच्या जनसंवाद यात्रेच्या दरम्यान अल्लीटोला गावाला भेट देऊन तेथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. गावातील शेतकऱ्यांनी युरिया खरेदी, दुबार पेरणी, आणि नुकसान भरपाई मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत आपली व्यथा मांडली.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कृषी केंद्राकडून युरिया डबल किमतीत विकत घेणे बंधनकारक केले जात आहे. पुरवठ्याची कमतरता सांगून, 250 रुपयांची युरिया पाचशे रुपयांना विकली जाते. शिवाय, एका युरियाच्या बॅगसोबत लिक्विड युरिया घेणे बंधनकारक असल्यामुळे शेतकऱ्यांना आणखी आर्थिक भार सहन करावा लागतो. नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांना यंदा दुबार पेरणी करावी लागली आहे. त्याचा मोठा आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडला आहे, आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदतीची गरज आहे.
नुकसान भरपाई मिळण्यासाठी ‘ई-पिक’ प्रक्रिया आवश्यक आहे. मात्र, ग्रामपंचायतमधील अनेक दुर्गम भागांमध्ये नेटवर्क अभावी शेतकऱ्यांना ई-पिक प्रक्रिया करता आली नाही. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येत आहेत. गावातील पाणीपुरवठ्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकली जात नसल्यामुळे आजारांचा प्रसार होत आहे. तसेच, फवारणीसाठी दिलेल्या फॉगर मशीनचा योग्य वापर कसा करावा याची माहिती स्थानिकांना नसल्यामुळे त्याचा वापर होत नाही.
डॉ. शिलू चिमुरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या असून , त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत.” आणि या समस्या सोडवण्याकरता लवकरच आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. या भेटीदरम्यान सरपंच गणेश गावडे , दीपक कटंगे, सुखलाल हेडामी, तिलक काटंगे , संदीप कुंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






